‘मंदिरे उघडण्याचा निर्णय आता केंद्र सरकारच्या हाती, मोदींसमोरच शंखनाद करून विनंती करा!’

0
687

मुंबईः राज्यातील मंदिरे सर्वसामान्यांसाठी खुली करण्याच्या मागणीसाठी भाजपने आज राज्यभर शंखनाद आंदोलन सुरू केले आहे. भाजपच्या या आंदोलनावरून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मंदिरे उघडण्याचा निर्णय आता केंद्र सरकारच्या हाती आहे. बेशुद्ध आणि बेधुंद असलेल्या भाजप नेत्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसमोर शंखनाद करून मंदिरे उघडण्याची विनंती करावी, असा सल्ला वडेट्टीवार यांनी दिला आहे.

मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपचे राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. पुण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात कसबा गणपती समोर आंदोलन करण्यात आले. भाजप कार्यकर्ते ठिकठिकाणी भाजपचा झेंडा हाती घेऊन आंदोलन करत आहेत आणि महाविकास आघाडी सरकारविरुद्ध घोषणाबाजी करत आहेत. यावरूनच मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपला चांगलेच धारेवर धरले आहे.

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश कर्नाटक यासारख्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. तेथील सर्व मंदिरे बंद असून दारू दुकाने पूर्णवेळ सुरू आहेत. कोरोनाची दुसरी लाट सुरू असतानाही सर्व बंद पण दारू दुकाने मात्र सुरू हा प्रकार भाजप शासित राज्यांमध्ये झाला. तिकडे शंखनाद करायला आवाज नाही का?, असा सवालही वडेट्टीवार यांनी केला आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका बघता मंदिरे न उघडण्याची सूचना देशातील सर्व राज्यांना केंद्र सरकारने दिली आहे. मंदिरे उघडण्याचा निर्णय हा आता केंद्र सरकारकडे आहे. बेशुद्ध आणि बेधुंद असलेल्या राज्यातील भाजपच्या नेत्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे शंखनाद करून मंदिरे उघडण्याची विनंती करावी, असा उपरोधिक सल्लाही वडेट्टीवार यांनी राज्यातील भाजप नेत्यांना दिला आहे. कोणतेही जनहितार्थ काम, मुद्दे आता भाजपकडे शिल्लक नसल्यामुळे पुन्हा जनतेच्या धार्मिक भावनांचा फायदा घेत त्याचे स्वतःच्या राजकारणासाठी भांडवल करण्याचा प्रकार राज्यातील भाजप नेते करत आहेत, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

हेही वाचाः शंखनाद आंदोलनः भाजप कार्यकर्त्यांचा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात घुसण्याचा प्रयत्न

भाजप नेते मोदीविरुद्ध आंदोलन करणार काकाँग्रेसचा सवालः दरम्यान, भाजपच्या या आंदोलनावरून काँग्रेसने भाजपला बिनतोड सवाल केले आहेत. केंद्र सरकारने उत्सवांवर निर्बंध घालण्याचे निर्देश दिले आहेत. भाजप नेते मोदींविरुद्ध आंदोलन करणार का? भाजप सरकारांनी कावड यात्रेवर बंदी का घातली?, असे सवाल करत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपला ‘शंखासुरा’ची उपमा दिली आहे. शंखासूर भाजप आंदोलनातून सरळ सरळ कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करत आहे. चंद्रकांत पाटील स्वतः मास्क घालत नाहीत. मोदी सरकारच्या निर्देशांनाही किंमत देत नाहीत. अध्यात्मिक आघाडी या थोतांडातून अध्यात्म या पवित्र मार्गाचे विकृतीकरण हिंदू धर्माचा अवमान आहे, असेही सावंत यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा