पाच वर्षे सत्तेत राहूनही भाजप मागत आहे कलम 370, नरेंद्र मोदींच्याच नावे मतांचा जोगवा

0
79
संग्रहित छायाचित्र.

दीपांकर कौशल / मुंबई

 राज्यामध्ये गेली पाच वर्षे सत्तेत असलेल्या भाजप- शिवसेना युतीला यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही जम्मू- काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नावाने मते मागण्याची वेळ आली. विरोधी पक्षनेते असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्येस जबाबदार धरून मुख्यमंत्र्यांवरच खुनाचा दाखल करा, अशी मागणी करणारे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात गेल्या पाच वर्षांत 16 हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या होऊनही त्यावर आणि शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीवर चकार शब्दही बोलायला तयार नाहीत. उलट केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये राफेल विमानाच्या चाकाखाली ठेवलेल्या लिंबूभोवतीच महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक फिरवत ठेवण्याची भाजपची रणनिती दिसू लागली आहे.

गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या राज्याच्या विविध भागात सभा झाल्या. या सभांमधून त्यांनी नरेंद्र मोदी आणि कलम 370 चाच जयघोष करत मतदारांना मते मागितली आहेत. सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे झालेल्या सभेत फडणवीसांनी मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जाण्याचे काम करत आहे. मोदींच्या नेतृत्वात अमेरिकेत 1 लाख लोकांची सभा झाली. त्या सभेत डोनाल्ड ट्रम्प उपस्थित होते. यापूर्वी अशा कोणत्याही भारतीय नेत्याची सभा अमेरिकेत झाली तरी एक मंत्रीही उपस्थित नसायचे. मोदी फक्त भारताचे नाही तर जगाचे नेते आहेत. त्यांचे वैश्विक नेतृत्व जगाने मान्य केले आहे. मोदींना बहुमत दिले म्हणून कलम 370 हटवून देशाला एकसंघ ठेवण्याचे काम सरकारने केले ,अशा शब्दात मोदींचे कौतुक करत मते मागितली.

भाजप अध्यक्ष अमित शाह यांची सांगली जिल्ह्यातील जतमध्ये सभा झाली. या सभेत त्यांनीही नरेंद्र मोदी आणि कलम 370 वरच सर्व भर दिला. पूर्वी पंतप्रधानांनी परदेश दौरा केला तरी कुणाला कळतही नसे. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा परदेश दौर्‍यावर जातात. तेव्हा तेथील लोक त्यांचे थाटात स्वागत करतात. मोदी मोदी अशा घोषणा दिल्या जातात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना परदेशात मिळणाऱ्या या मानसन्मानामुळे काँग्रेसला पोठदुखी होत आहे. 70 वर्षांनंतर कलम 370 हटवण्यात यश आले. कलम 370 हटवल्यामुळे काश्मीरमधील जनता आता शांतता अनुभवत आहे, असे शाह म्हणाले. राज्यात 15 वर्षे केलेल्या कारभारावरूनही अमित शहा यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले. केंद्रात 10 वर्षे आणि राज्यात 15 वर्षे सत्तेत असताना काय केले, याचा हिशेब शरद पवार यांनी द्यावा, असे आव्हानही त्यांनी दिले. मात्र भाजपच्या राजवटीतील पाच वर्षांच्या हिशेबाबाबत ते काहीच बोलले नाहीत.

 शिवसेनेच्या अजेंड्यावरही कलम 370

भाजपकडून स्थानिक प्रश्न सोडून कलम 370 च्या मुद्यावर भर दिला जात असल्याचे आरोप होत असताना शिवसेनेकडूनही आपल्या प्रचारात कलम 370 वर भर दिला जात आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कलम 370 वर भर दिला होता. अहमदनगर येथे झालेल्या सभेतही त्यांचा भर यावरच होता. त्यामुळे शिवसेना- भाजप कलम 370 आणि राफेलच्या चाकाखालच्या लिंबाभोवतीच विधानसभा निवडणुकीचा प्रचार फिरवत ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत , हे स्पष्ट होत आहे.

 सरसकट कर्जमाफी, शेतकरी आत्महत्यांना बगल

राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि पाच वर्षांत झालेल्या 16 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा कळीचा मुद्दा असताना सत्ताधारी भाजप- शिवसेना महायुतीचे नेते या दोन्ही प्रश्‍नांकडे पद्धशीर दुर्लक्ष करताना दिसू लागले आहेत. महायुतीचा कोणताच नेता या प्रश्‍नांबरोबरच तरूणांसाठीच्या रोजगार निर्मितीवरही बोलताना दिसत नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा