फडणवीस-पाटलांनीच थांबवली ‘मी पुन्हा येईन’ची चर्चा, आता प्रखर विरोधी पक्षाच्या भूमिकेत!

0
388
छायाचित्रःtwitter/@BJP4Maharashtra

मुंबईः राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून हे सरकार कधी पडणार याचे मुहूर्त सांगणाऱ्या भाजपचा रोख आता पूर्णतः बदलला आहे. आजच्या भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत याचीच प्रचिती आली. या बैठकीत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करणे ही आपली भूमिका आहे, असे सांगत ‘मी पुन्हा येईन’च्या चर्चेला अखेर पूर्णविराम दिला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सरकार कधी येणार हे डोक्यातून काढून टाका, असे सांगत चंद्रकांत पाटलांच्या सूरात सूर मिसळला.

दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात आयोजित भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात आपण प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचे ठरवले असल्याचे स्पष्ट केले. जूनमध्ये आपण एकत्र आल्यानंतर खूप घडामोडी घडल्या आहेत. आपण जूनमध्ये एकत्र आलो आणि भविष्यातील सर्व कार्यक्रमांची आणि आंदोलनाची दिशा आपण ठरवली. आपण सगळ्यांनी त्यावेळी एकमेकांना नीट समजावून सांगितले की, आपल्याला एक प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करायचे आहे. ती भूमिका जूनपासून आपण खूपच चांगल्या प्रकारे बजावली, असे पाटील म्हणाले.

चला उद्योजक बनाः राज्यात औद्योगिकदृष्ट्या अविकसित, विकसनशील भागांसाठी पीएसआय योजना, कसा घ्यायचा लाभ?

अगदी काल-परवा नवाब मलिकांचे पुतळे जाळण्याचा जो कार्यक्रम आपण दिला तो केवळ आदल्यादिवशी रात्री ९ वाजता एका व्हिडीओ कॉलवर आपण दिला आणि दुसऱ्या दिवशी किमा २६-२७ मोठ्या शहरांत पुतळे जाळल्या गेले आणि कुठेही पुतळा जाळताना तो जाळला गेला नाही आणि अटक झाली, असे झाले नाही. एवढ्या कमी वेळात त्याचे नियोजन झाले. त्यानंतर पेट्रोलवरील व्हॅट कमी करावा म्हणून राज्यात चारशे ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांची आंदोलने झाली. एसटी कामगारांच्या संपात भाजपचा सक्रीय सहभाग आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. सरकार कधी येणार… देवेंद्रजी कानात तर सांगा… आम्ही कुणाला सांगणार नाही… आता ही चर्चा बंद करा, असेही पाटील म्हणाले.

‘मी पुन्हा येईन’ची बहुचर्चित हाळी देणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही असेच स्पष्ट करत भूमिका मांडली. भाजपचे सरकार येईल, पण कधी येणार हे डोक्यातून काढून टाका. सरकार येईल तो आपला बोनस समजा. आपल्याला शस्त्र घेऊन लढायचे आहे. आधी आगामी महानगर पालिका निवडणुकांमध्ये यांना पाणी पाजू. त्यानंतर स्वतःचे सरकार आणून दाखवू. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी लागावे, असे फडणवीस म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा