दिल्लीनंतर आता कोलकाताः केंद्रीय गृह मंत्री अमित शाहांच्या रॅलीत घुमल्या ‘गोली मारो…’च्या घोषणा

0
147

कोलकाताः दिल्लीतील हिंसाचारापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिल्लीत दिलेली  ‘गोली मारो…’ ची घोषणा आता कोलकोत्यात पोहोचली आहे. देशाचे गृह मंत्री अमित शाह यांच्या कोलकोत्यातील रॅलीत भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड त्वेषाने ही घोषणा दिली. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

पश्चिम बंगालमध्ये आपले सरकार आणण्यासाठी भाजपने आतापासूनच सर्व शक्ती पणाला लावली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या रॅलींचे आयोजन केले जात आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनीही पश्चिम बंगालमध्ये आजपर्यंत अनेक रॅली आणि सभा घेतल्या आहेत. नागरिकत्व दुरूस्ती कायदा ( सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदवहीच्या ( एनआरसी) मुद्यांवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अमित शाह यांच्यात विस्तवही आडवा जात नाही. या मुद्यावर दोन्ही पक्ष आमने-सामने आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या हालचाली वाढल्यानंतर हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत आणि अनेकदा वातावरण तणावपूर्ण बनले आहे. त्यातच रविवारी झालेल्या अमित शाह यांच्या रॅलीत दिल्लीत ज्या घोषणेमुळे राजकीय घमासान झाले आणि त्यानंतर हिंसक घटना घडल्या तीच ‘गोली मारो…’ची घोषणा देण्यात आली.

अमित शाह यांच्या कोलकोत्यातील रॅलीच्या एक दिवस आगोदर भाजप नेता कपिल मिश्रा यांनी दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या ‘शांती मार्च’मध्येही ‘देश के गद्दारों को, गोली मारो… को’ची घोषणा देण्यात आली होती. त्याच दिवशी दिल्लीच्या राजीव चौक मेट्रो स्टेशनवरही ‘गोली मारो…’ची घोषणा देण्यात आली होती. दिल्लीच्या मॉडल टाऊन मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कपिल मिश्रा यांनी आपल्या प्रचारात पहिल्यांदा या घोषणेचा वापर केला होता. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही दुसऱ्या एका प्रचारसभेत ही घोषणा सभेला उपस्थित लोकांकडून वदवून घेतल्यानंतर हा मुद्दा वादाच्या केंद्रस्थानी आला होता.

या द्वेषमूलक घोषणेनंतर दिल्लीत अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या होत्या. सीएएविरोधात शाहीनबागेत सुरू असलेल्या आंदोलनातही गोळीबाराची घटना घडली होती. याच परिस्थितीत कपिल मिश्रा हिंसाचाराच्या आधी जाफराबादेत पोहोचले आणि त्यांनी सीएएविरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांना हटवण्याची धमकी दिली. तणाव वाढला, दंगल उसळली आणि त्यात किमान ४३ लोक मारले गेले. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीआधीच ही घोषणा पोहोचल्यामुळे तेथेही तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण पश्चिम बंगालमध्ये आधीच परिस्थिती नाजूक आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा