शिवसेनेचा भाजपला पुन्हा झटकाः ७ विद्यमान आणि ३ माजी नगरसेवकांनी बांधले शिवबंधन

0
544
छायाचित्रः twitter/@ShivSena

मुंबईः ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्ह्यात भाजपला एका पाठोपाठ एक हादरे बसू लागले आहेत. मुक्ताईनगरमधील भाजपच्या ७ विद्यमान आणि ३ माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.

 राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर स्थानिक पातळीवरील राजकारणही झपाट्याने बदलू लागले आहे. राज्यातील अनेक महानगरपालिकांमधील भाजपचे नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देऊन सत्ताधारी महाविकास आघाडीच्या घटक पक्षात सहभागी होऊ लागले आहेत. जळगाव महापालिकेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला धोबी पछाड दिल्यानंतर सांगलीतही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘करेक्ट कार्यक्रम’ करत भाजपला धक्का दिला होता.

जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपच्या अनेक नगरसेवकांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेचा विजय झाला होता. आता मुक्तानगई नगरपालिकेतील भाजपच्या ७ विद्यमान आणि ३ माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे हा भाजपला आणखी एक मोठा धक्का मानण्यात येत आहे.

मुक्ताईनगर नगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक पियुष महाजन, संतोष कोळी, मुकेश वानखेडे यांच्यासह अन्य ४ विद्यमान नगरसेवकांसह ३ माजी नगरसेवकांनीही भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशाच्या वेळी पणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित होते. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी हा प्रवेश समारंभ झाला.

भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केलेले मुक्ताईनगरचे नगरसेवक. सोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व इतर

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा