‘भाजपच्या ज्येष्ठ नेत्यासह ३० आमदार लवकरच महाविकास आघाडीत येणार, अब आयेगा मजा’

0
606

मुंबईः महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये पडणार, अशी भविष्यवाणी करणाऱ्या भाजपलाच आता जबर धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपतील एका ज्येष्ठ नेत्यासह ३० भाजप आमदार महाविकास आघाडीमध्ये सामील होणार असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. राऊतांचा हा दावा खरा ठरला तर ‘मी पुन्हा येईन’चे देवेंद्र फडणवीसांचे स्वप्न अधुरेच राहणार आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून हा खळबळजनक दावा केला आहे. विशेष म्हणजे संजय राऊत यांनी हे ट्विट हिंदीमध्ये केले आहे. ‘महाराष्ट्र भाजपा के एक ज्येष्ठ नेता के साथ ३० विधायक जल्द ही महाविकास आघाडी में शामील होंगे. अब आयेहा मजा, जय महाराष्ट्र,’ असे राऊत यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 संजय राऊत यांच्या या ट्विटनंतर महाविकास आघाडीमध्ये ३० आमदार घेऊन सामील होणार ज्येष्ठ भाजप नेता कोण? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे गेल्या काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारनाम्यांचा उघडपणे पर्दाफाश करू लागले आहेत. एवढेच नव्हे तर ‘नानासाहेब पंत फडणवीसांचे कारनामे’ असे पुस्तक लिहिणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. त्यानंतर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी  फडणवीसांनी खडसेंच्या रूपात ओबीसी नेतृत्व संपवल्याचा घणाघाती आरोपही केला आहे. त्यामुळे हा ज्येष्ठ नेता नाथाभाऊ तर नाही ना? असा कयास लावला जात आहे.

विशेष म्हणजे ज्या ट्विटर अकाऊंटवरून हा दावा करण्यात आला आहे ते संजय राऊत यांचे व्हेरिफाइड ट्विटर अकाऊंट नाही. संजय राऊत यांचे व्हेरिफाइड ट्विटर अकाऊंट @rautsanjay61 असे आहे. तर ही पोस्ट @rautsanjay67 या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या नावाने फेक ट्विटर अकाऊंट काढून फेक बातम्या पसरवण्याचा हा ट्रोल आर्मीचा उद्योग असल्याची शंका घेण्यात येऊ लागली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा