अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपचीच परीक्षा, चार मंत्र्यांच्या अहवालावरून सरकारच करणार कोंडी!

0
308
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर राज्य विधिमंडळाचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या सोमवारपासून सुरू होत असून या अधिवेशनात सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपच्या चार मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे अहवाल विधिमंडळाच्या पटलावर ठेवणार आहे. त्यामुळे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपचीच या अधिवेशनात कोंडी होण्याची शक्यता आहे.

विधिमंडळाच्या या अधिवेशनात राज्यात गेल्या काही महिन्यांत घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटना, शेतकरी कर्जमाफी आणि सीएए- एनआरसी या मुद्यांवरून वातावरण तापवण्याची विरोधी पक्षाची तयारी असतानाच राज्य सरकारने फडणवीसांच्या कार्यकाळातील चार मंत्र्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा अहवाल विधिमंडळात सादर करण्याची भूमिका घेतली आहे. फडणवीसांनी क्लिनचीट दिलेल्या या मंत्र्यांचे अहवाल विधिमंडळाच्या पटलावर ठेवल्यानंतर त्यातून पुढे येणाऱ्या तपशीलामुळे भाजप आणि त्यांना क्लीनचीट देणारे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची सरकारची रणनिती आहे. त्यामुळे सरकारवर आक्रमकपणे तुटून पडण्याच्या इराद्यात असलेल्या फडणवीसांचे अवसान गळून गेल्यास सरकारला हे अधिवेशन सहजपणे पार पाडता येईल, असे चिन्हे आहेत.

आ अधिवेशनात सर्व माध्यमांच्या शाळांत पहिली ते आठवीच्या अभ्यासक्रमात मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय होणार आहे. या अधिवेशनाच्या दोन दिवसआधीच शनिवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,मुख्यमंत्री उद्धव ठाके, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, शिवसेना नेते संजय राऊत यांची वर्षा बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीत अधिवेशनावर चर्चा झाल्याचे सांगितले जाते. भाजप सरकारमधील मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता आणि सुभाष देशमुख या चार मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे अहवाल विधिमंडळात मांडले जातील.

क्लीनचीट देणे फडणवीसांनाच भोवणार?: भाजप सरकारमधील तब्बल २३ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले होते. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेवगळता अन्य सर्वच मंत्र्यांना घाऊक क्लीनचीट देण्याचे धोरण अवलंबले होते. पंकजा मुंडे यांच्यावर पोषण आहार आणि चिक्की घोटाळ्याचा आरोप झाला होता. त्याचा चौकशी अहवाल येण्याआधीच फडणवीसांनी पंकजांना क्लीनचीट दिली होती. प्रकाश मेहता यांच्यावरील कारवाई दोन वर्षे थंड्या बस्त्यात होती. फडणवीसांनी निर्माण केलेली स्वतःची ‘स्वच्छ’ प्रतिमा प्रत्यक्षात किती मलीन आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न या चार मंत्र्यांच्या चौकशी अहवालाद्वारे सरकारकडून केला जाण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा