नवाब मलिकांना बोलण्याचा अधिकार, समीर वानखेडेंच्या वडिलांची मागणी हायकोर्टाने फेटाळली

0
127
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः  एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने झटका दिला. वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधातील कोणतेही वक्तव्य करण्यास किंवा सोशल मीडियावर कोणतीही माहिती प्रकाशित करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना मनाई करावी, अशी मागणी केली होती. नवाब मलिक यांना बोलण्याचा अधिकार आहे, असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे.

नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्याविषयी जे ट्विट केले आहेत, ते वैयक्तिक हेतून केले आहेत. मात्र समीर वानखेडे हे सरकारी सेवक आहेत आणि त्यांच्याविरोधात नवाब मलिक यांनी लावलेले आरोप खोटे असल्याचे समोर आलेल्या कागदपत्रांवरून आताच्या टप्प्यावर म्हणता येणार नाहीत. ज्ञानदेव वानखेडे यांना खागसी जीवनाचा मूलभूत अधिकार असला तरी मलिक यांनाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. नवाब मलिक यांना बोलण्याचा अधिकार आहे, असे सांगत न्यायालयाने ज्ञानदेव वानखेडे यांची मागणी फेटाळून लावली आहे.

चला उद्योजक बनाः राज्यात औद्योगिकदृष्ट्या अविकसित, विकसनशील भागांसाठी पीएसआय योजना, कसा घ्यायचा लाभ?

मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना सल्लाही दिला आहे. कोणत्याही अधिकाऱ्याबद्दल कोणतेही विधान करण्यापूर्वी माहितीची पडताळणी केली पाहिजे. नवाब मलिक यांनी केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत, असे या टप्प्यावर म्हणणे योग्य ठरणार नाही. नवाब मलिक पोस्ट करू शकतात. परंतु सार्वजनिक स्तरावर त्यांना काही मांडायचे असल्यास त्यांनी किमान वाजवी पद्धतीने खातरजमा करणे आवश्यक आहे. त्यामुळे यापुढे त्यांनी खातरजमा करूनच बोलावे आणि सोशल मीडियावर पोस्ट करावी, असे न्यायमूर्ती माधव जमादार यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० डिसेंबर रोजी होणार आहे.

दरम्यान, न्यायालयाच्या या आदेशानंतर नवाब मलिक यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे. सत्यमेव जयते, अन्यायाविरुद्ध लढा सुरूच राहणार, असे नवाब मलिक यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा