मुद्रांक शुल्क कपातीमुळे बांधकाम क्षेत्रात तेजी, दस्त नोंदणीत ४८ टक्के वाढ

0
56
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बांधकाम क्षेत्राला लागलेली घरघर अखेर थांबली आहे. लॉकडाऊनमुळे बाजारातील मंदी व अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ लक्षात घेऊन महसूल विभागाने बांधकाम क्षेत्राला व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्रात तेजी येऊन घर खरेदी करणार्‍या ग्राहकांना मोठा फायदा झाला आहे. महसूल विभागाने राबाविलेलेल्या या योजनेमुळे सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत २०१९ च्या तुलनेत दस्तनोंदणीत ४८ टक्के वाढ होऊन राज्याच्या महसुलात ३६७ कोटी रुपयांची वाढ झाली आहे,  अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. 

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याने राज्याची अर्थव्यवस्थाही कोलडमली होती. कोरोनामुळे घरांची खरेदी-विक्री ठप्प झाल्याने बांधकाम व्यावसायिक अडचणीत सापडले होते.  त्यामुळे बाजारातील मंदी व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महसूल विभागाने मुद्रांक शुल्कात सरसकट ३ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. या सवलतीमुळे घर खरेदीस चालना मिळून बांधकाम क्षेत्रालाही संजीवनी मिळाली आणि राज्याच्या तिजोरीतही कोट्यावधीचा महसूल जमा झाला.  त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेने व उद्योगक्षेत्राने गती पकडली असे सांगतानाच राज्य सरकारच्या या निर्णयाचे केंद्र सरकारनेही कौतुक केले आहे.  शिवाय इतर राज्यांनीही महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचे अनुकरण करावे असे आवाहन केले आहे, असे महसूलमंत्री थोरात यांनी सांगितले.

महसूल विभागाने बांधकाम क्षेत्राला दिलेल्या बुस्टर डोसमुळे या क्षेत्रातील मरगळ जाऊन पुन्हा या क्षेत्रात मोठी उलाढाल झाली आहे. मुंबई, पुणे या मोठ्या शहराबरोबरच इतर शहरी भागातही घर खरेदीचे करणाऱ्यांचे स्वप्न या मुळे पूर्ण झाले. विशेषतः मोठ्या शहरात फ्लॅट खेरदीच्या किंमतीमुळे मुद्रांक शुल्कची लाखात भरावा लागत होता. त्यात घट केल्याचा फायदा झाल्याचे दिसत आहे. कोरोनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही खिळ बसली होती. महसूल विभागाने मुद्रांक शुल्कात मोठी कपात केल्याने तिजोरीत पैसा येणास मदत झाली व ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिक या दोघांचाही फायदा झाला असे महसूलमंत्री म्हणाले.

अशी झाली दस्त नोंदणी, महसुलात वाढ

  • डिसेंबर २०१९ मध्ये २ लाख ३९ हजार २९२ दस्तनोंदणीसह २ हजार ७१२ कोटींचा असलेला महसूल डिसेंबर २०२० मध्ये तब्बल ४ लाख ५९६०७ दस्त नोंदणी होऊन ४ हजार ३१४ कोटींचा महसूल प्राप्त झाला, डिसेंबरमधील दस्त नोंदणीत तब्बल ९२ वाढ टक्के तर महसूलात ५९ टक्के वाढ झाली आहे.
  • सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यात २०१९ साली ८ लाख ४४ हजार ६३६ दस्त नोंदणी होऊन महसूल ९ हजार २५४ कोटी रुपये मिळाला होता. तर २०२० मध्ये सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यात १२ लाख ५६ हजार २२४ दस्त नोंदणी झाली आणि ९ हजार ६२२ कोटी रुपये महसूल प्राप्त झाला. या चार महिन्यात दस्त नोंदणीत ४८ टक्के वाढ तर महसुलात ३.९७ टक्के वाढ झाली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा