औरंगाबादेत राज्यमंत्री सत्तारांनी दिले रोजचे ‘टार्गेट’, मंत्र्यांना ‘खुश’ करण्याचे अधिकाऱ्यांपुढे आव्हान!

0
921

औरंगाबादः महाराष्ट्रात राजकारणात ‘टार्गेट’ या शब्दाने भल्याभल्या राजकारण्यांना धडकी भरू लागली असतानाच औरंगाबादेत नव्या ‘ टार्गेट’चे प्रकरण समोर आले आहे. राज्यातील कोरोनाच्या संसर्ग वाढीला ब्रेक लावून संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने सोमवारपासून राज्यभर कडक निर्बंध लागू करून  किराणा दुकाने, दुध, भाजीपाला व फळविक्रीच्या दुकानांसह अत्यावश्यक सेवा वगळता अन्य बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश जारी केले असतानाच महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंबादेतील अधिकाऱ्यांना दररोज कारवाईचे ‘टार्गेट’ पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. सत्तार यांचे हे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या स्वाक्षरीनिशी सर्व विभागप्रमुखांना कळवण्यात आले आहेत.

राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. देशातील कोरोना संसर्गाच्या टॉप टेन जिल्ह्यात औरंगाबादसह राज्यातील ८ जिल्ह्यांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने सोमवारपासून राज्यात ‘ब्रेक दि चेन’ मोहीम सुरू केली असून या मोहिमेअंतर्गत राज्यात कठोर निर्बंध आणि शनिवार- रविवार कडकडित लॉकडाऊन लागू केला आहे.

 राज्य सरकारच्या ब्रेक दि चेन मार्गदर्शक सूचनांची औरंगाबाद जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासाठी सोमवारी दुपारी ४ वाजता महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत राज्यमंत्री सत्तार यांनी ब्रेक दि चेनच्या अंमलबजावणी दरम्यान सर्व अधिकाऱ्यांना कारवाईचे ‘टार्गेट’ दिले आहे. सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठरवून दिलेले हे दररोजचे ‘टार्गेट’ पूर्ण करावे, असे निर्देश सत्तारांनी दिले असून सत्तारांचे हे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या स्वाक्षरीनिशी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे.

असे आहेत सत्तारांचे निर्देश आणि ‘टार्गेट’:

  • ब्रेक दि चेनअंतर्गत सर्व रेस्टॉरंट्स, बार आणि हॉटेल्स बंद राहणार आहेत. हॉटेल्सना सकाळी ७ ते रात्री वाजेपर्यंत टेक अवे म्हणजेच पार्सल सुविधा देण्याची मुभा आहे. अन्न व औषधी प्रशासनाने तीन पथके स्थापन करून नियमांचे पालन न करणाऱ्या किमान २० हॉटेल्सवर दररोज कारवाई करावी, असे टार्गेट सत्तारांनी दिले आहे.
  • ३० एप्रिलपर्यंत राज्यातील बार आणि मद्यविक्रीची दुकाने बंदच राहणार आहेत. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने आपल्या कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची पाच पथके स्थापन करून कोविड नियमाचे पालन न करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अखत्यारितील किमान १० आस्थापनांवर दररोज कारवाई करावी, असे टार्गेट देण्यात आले आहे.
  • प्रादेशिक परिवहन विभाग म्हणजेच आरटीओने  दोन पथके स्थापन करून कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन न करणाऱ्या किमान १०० वाहनांवर दररोज कारवाई करण्याचे टार्गेट देण्यात आले आहे.

 हे ‘टार्गेट’  पूर्ण करण्यासाठी तत्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले असून औरंगाबादचे पोलिस आयुक्त, महानगरपालिकेचे प्रशासक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षक आणि सर्व संबंधितांना आवश्यक त्या कार्यवाहीस्तव जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने राज्यमंत्री सत्तारांचे हे निर्देश कळवण्यात आले आहेत. परंतु औरंगाबादेतील आस्थापनांनी जर निर्बंधांचे काटेकोर पालन केले तर राज्यमंत्री सत्तारांनी दिलेले हे दररोजचे ‘टार्गेट’ कसे पूर्ण करणार? की ‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी उल्लंघन केले नाही तरी कारवाई करणार? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असून ‘टार्गेट’पूर्ती करून मंत्र्यांना ‘खुश’ करण्याचे अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा