महाराष्ट्रात स्वतंत्र कृषी कायदा कराः काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
25
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांमुळे होणारे शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र कायदा करावा, अशी मागणी काँग्रेस नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या कायद्यामध्ये शेतमाल खरेदीच्या व्यवहारासाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) अनिवार्य करण्यासह शेतकरी हिताच्या विविध तरतुदींचा समावेश असावा, असा आग्रह चव्हाण यांनी धरला आहे.

अशोक चव्हाण यांनी गुरूवारी रात्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भातील मागणीचे पत्र दिले. केंद्राच्या कृषी कायद्यांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी चांगले कायदे केले आहेत. या कायद्यांमुळे तेथील शेतकरी आणि ग्राहकांना दिलासा मिळणार असल्याकडे चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. अन्य राज्यांच्या धर्तीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेसुद्धा नवीन कायदा करून शेतकऱ्यांना संरक्षण देण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे, असे चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे.

खासगी खरेदीदारांना कृषीमालाच्या खरेदीचे करार आणि व्यवहार किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी किंमतीने करण्यास प्रतिबंध घालणे, शेतमाल खरेदी-विक्रीबाबतचे करार, व्यवहारांसाठी शेतकऱ्याची संमती अनिवार्य करणे, फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांना दिवाणी न्यायालयात दाद मागण्याचा हक्क प्रदान करणे, शेतकऱ्यांची फसवणूक अथवा छळ केल्यास दीर्घ मुदतीचा कारावास तसेच मोठ्या रक्कमेच्या आर्थिक दंडाची तरतूद करणे, व्यापाऱ्यांना शेतमालाचा अमर्याद साठा करता येणार नाही यासाठी साठवण क्षमतेवर मर्यादा घालणे, कृषीमालाच्या व्यवहारांसाठी इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफार्मच्या माध्यमातून पारदर्शक लिलाव आणि ऑनलाइन पेमेंटची सुविधा प्रदान करणे आदी तरतुदींचा राज्याच्या कृषी कायद्यात समावेश असावा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा