प्लेग आटोक्यात आणण्यासाठी ब्रिटिशांनी केलेल्या कायद्याची राज्यात कोरोनासाठी अंमलबजावणी सुरू

0
671
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्यात कोरोनाचे रूग्ण आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्य सरकारने संसर्गजन्य आजार टाळण्यासाठीचा १८९७ (२) या कायद्याची अंमलबजावणी काल मध्यरात्रीपासूनच केली आहे.  ब्रिटिशांनी प्लेग आटोक्यात आणण्यासाठी भारतात हा कायदा लागू केला होता. त्यामुळे राज्यात ज्या संस्थांना धार्मिक, सांस्कृतिक, व्यावसायिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रमांना दिलेली परवानगी रद्द करण्यात आली असून पुढील आदेश होईपर्यंत राज्यात कोणतेही कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

राज्यात कोरोनाचे रूग्ण आढळून आलेल्या कोरोनाच्या रुग्णांत सौम्य स्वरूपाची लक्षण आढळून येत आहेत. आजपर्यंत पुण्यात १०, मुंबईत ३, ठाण्यात १ आणि नागपुरात ३ असे १७ रूग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमी मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत निवेदन केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सरकारने केलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांची माहिती दिली.

ब्रिटिशांनी भारतातील प्लेग आटोक्यात आणण्यासाठी ४ फेब्रुवारी १८९७ रोजी संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा १८९७ अंमलात आणला होता. या कायद्यातील तरतुदीनुसार ब्रिटिश अधिकाऱ्यांना प्लेगच्या रूग्णांना घरातून बाहेर काढण्याचा अधिकार बहाल केला होता. या काद्यातील तरतुदीविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचा अधिकारही नागरिकांना नव्हता. या काद्यातील कलम २ नुसार एखादा संसर्गजन्य आजार धोक्याची पातळी ओलांडतो तेव्हा तो नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार अतिरिक्त अधिकार प्राप्त होतात. संसर्गजन्य रोगाने ग्रासलेल्या रूग्णांना प्रतिबंधित करण्याचे अधिकार हा कायदा राज्य सरकारला देतो. या कायद्यातील कलम २ (ब) नुसार एखाद्या रुग्णाला रूग्णालयात वेगळे ठेवण्याच्या आणि प्रवास करण्यावर बंदी घालण्याच्या उपायाचांही समावेश आहे.

संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायद्यातील कलम ३ नुसार एखाद्या व्यक्तीन कायद्यातील कलम दोन मानण्यास नकार दिला किंवा विरोध केला तर भारतीय दंड विधानाच्या कलम १८८ नुसार त्याच्याविरोधात कारवाई करण्याचा अधिकारही राज्य सरकारला प्राप्त होतो. मात्र राज्य सरकारने सध्या या कायद्यातील कलम २ ची अंमलबजावणी सुरू केलेली आहे.

२००९ मध्ये पुण्यात लागू केले होते कलम २- भारतात प्लेगची साथ आटोक्यात आल्यानंतर गेल्या शंभर वर्षांत एकदाही या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. मात्र २००९ मध्ये पुण्यात स्वाईन फ्लू आजाराचा संसर्ग वाढल्यानंतर या कायद्यातील कलम २ लागू करण्यात आले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा