पदवीधर निवडणूकः आमदार सतीश चव्हाणांच्या विरोधात भावानेच दाखल केला उमेदवारी अर्ज!

0
565
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ३९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून या उमेदवारी अर्जांची आज छानणी होणार आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांचे भाऊ प्रदीप चव्हाण यांचाही उमेदवारी अर्ज असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सतीश चव्हाणांविरुद्ध हे प्रदीप चव्हाणांचे हे बंड तर नाही ना? अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीविरुद्ध भाजप अशी थेट लढत होईल, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच भाजपमध्ये उमेदवारी देण्यावरून झालेली धुसपुस पाहता सर्वाधिक बंडखोरी झाल्याचे दिसत आहे. भाजपने अधिकृत उमेदवारी दिलेले शिरीष बोराळकर यांच्याविरोधात प्रवीण घुगे, विवेकानंद उजळंबकर यांनी भाजपच्या वतीने तर बीड जिल्ह्यातील भाजप नेते रमेश पोकळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र यात विशेष बाब ठरली तो या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांच्या भावांचा उमेदवारी अर्ज.

हेही वाचाः शिरीष बोराळकरांसाठी एकाचे तिकिट कापलेः पंकजा मुंडेंचा नेमका कुणावर निशाणा?

सतीश चव्हाण यांनी स्वतः तीन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या मतदारसंघातून ते सलग दोनवेळा निवडून आले असून तिसऱ्यांदा ते आपले भवितव्य आजमावत आहेत. मात्र त्यांचे भाऊ प्रदीप भानुदास चव्हाण यांनीही या निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. खबरदारी म्हणून सतीश चव्हाणांनीच प्रदीप चव्हाण यांना डमी उमेदवारी अर्ज दाखल करायला लावला की प्रदीप चव्हाणांनी भावाच्या विरोधातच बंड पुकारून निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला, अशी चर्चा प्रदीप चव्हाणांच्या उमेदवारीमुळे राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हेही वाचाः मराठवाडा पदवीधर मतदारसंघात ३९ जणांचे उमेदवारी अर्ज, सर्वाधिक बंडखोरी भाजपमध्ये!

दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची आज छानणी केली जाणार आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे आता जे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत, त्यापैकी किती उमेदवार आपले अर्ज मागे घेतात आणि किती जण निवडणुकीच्या रिंगणात कायम राहतात, हे १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र पुढचे चार दिवस कोणाची बंडखोरी कुणासाठी डोकेदुखी ठरणार आणि कोण कुणाची कशी जिरवणार, याबाबतच्या चर्चा चविष्टपणे केल्या जाणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा