‘परमबीर सिंगांनी एन्काऊंटरमध्ये ठार मारण्याची धमकी देऊन खंडणी घेतली, मालमत्ता बळकावली’

0
932
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप करून महाराष्ट्राच्या  राजकारणात खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या भ्रष्टाचाराच्या अनेक कथा आता तक्रारींच्या माध्यमातून समोर येत आहेत. ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना परमबीर सिंग यांच्या सूचनेवरून आपणाला एन्काऊंटरमध्ये मारण्याची धमकी देऊन खंडणी वसूल करण्यात आली आणि मालमत्ता बळकावण्यात आली, असा सनसनाटी आरोप विरार येथील बिल्डर मयूरेश राऊत यांनी केला आहे. परमबीर सिंग यांचे कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम आणि रवी पुजारी टोळीशी घनिष्ठ संबंध असल्याचा आरोपही राऊत यांनी तक्रारीत केला आहे.

मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख प्रदीप शर्मा, पोलिस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या माध्यमातून परमबीर सिंग यांनी आपल्याला लुबाडले. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि एन्काऊंटरमध्ये मारण्याची धमकी देऊन खंडणी वसूल करण्यात आली तसेच मालमत्ता बळकावण्यात आली, असे राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

परमबीर सिंग, प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे यांनी पदाचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांची खंडणी वसूल केली. माझ्यासह अनेक बिल्डरांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि एन्काऊंटरमध्ये ठार मारण्याची धमकी देऊन मालमत्ता स्वतःच्या नावे करून घेतली. यापूर्वी मी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही काहीच कारवाई झाली नाही. आता परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अनेक जण तक्रारी करण्यासाठी पुढे येत असल्यामुळे मीसुद्धा ही तक्रार केली आहे. परमबीर सिंग व प्रदीप शर्मा यांचे कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम, रवी पुजारी टोळीशी घनिष्ठ संबंध होते, असेही राऊत यांनी तक्रारीत म्हटले आहे.

 खंडणीविरोधी पथकाचे निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी माझे मित्र सतीश मांगले यांच्याविरुद्ध एका प्रकरणात एफआयआर दाखल झाल्याने मला ५ नोव्हेंबर २०१७ रोजी बोलावले होते. त्यात माझा सहभाग नसल्याचे चौकशीअंती आढळून आल्यानंतर मला सोडून देण्यात आले. मात्र त्यानंतर काही दिवसांनी  त्यांनी मला फोन करून प्रदीप शर्मा यांनी बोलावल्याचे सांगितले आणि मला रात्रभर लॉकअपमध्ये डांबून ठेवले. मांगले प्रकरणात मला अडकवण्याची आणि एन्काऊंटरमध्ये ठार मारण्याची देऊन त्यांनी मला लाथाबुक्क्यांनी आणि पट्ट्याने बेदम मारहाण केली. परमबीर सिंग यांच्या सांगण्यावरून दोघांनी मला ठार मारण्याची धमकी देऊन पालघर येथील माझ्या निवासी बांधकाम प्रकल्पाची कागदपत्रे बळीजबरीने बळकावून स्वतःच्या नावाने करार करून घेतला, असे राऊत यांनी तक्रारीत म्हटले आहे.

दहिसर येथील लोढा अॅक्वा इमारतीतील फ्लॅट तसेच माझ्या मालकीच्या फॉर्च्युन आणि मर्सिडीज या दोन कार कोथमिरे यांनी बळकावल्या. प्रदीप शर्मा, कोथमिरे यांनी माझी मालमत्ता हडपण्यासाठी पत्नी व माझ्या भावाला धमकावून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. घरातील महिलांचा विनयभंग केला, असे राऊत यांनी तक्रारीत म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा