छत्रपती शिवरायांचे स्मारक अरबी समुद्रात नको, जमिनीवरच बांधाः मराठा सेवा संघाची मागणी

0
265
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबईत होऊ घातलेले स्मारक अरबी समुद्रात न बांधता जमिनीवरच बांधा, अशी मागणी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली आहे. या संदर्भात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

समुद्रात उभ्या राहणार्‍या स्मारकाची देखभाल, दुरुस्ती आणि सुरक्षा करणे खूपच जिकिरीचे आहे. आपण स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. त्यामुळे मी हे सांगू शकतो. न्यूयॉर्कमधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी वर्षातून तीन ते चार महिने पूर्णतः बंद ठेवावे लागते. पाण्यात असल्याने त्याला गंज चढतो. समुद्रातील स्मारकाला भेट द्यायची असेल तर ते भरती-ओहोटीवर अवलंबून असते. म्हणजेच वेळेची मर्यादा तर येते शिवाय तेथे जाणे खर्चिकही असते, असे खेडेकर म्हणाले.

 अरबी समुद्राच्या जवळपासच हे स्मारक बांधायचे असल्यास सध्या जेथे राजभवन आहे, तेथे ते उभारावे. राजभवन मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यांच्या जागेत हलवावे, असे सांगतानाच खेडेकर यांनी अन्य दोन जागांचेही पर्यात सूचवले. महालक्ष्मी रेसकोर्स आणि रे रोड, डॉकयार्ड या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागा हेही पर्याय आहेत. स्मारक जमिनीवर उभारल्यास ते अर्ध्या  खर्चात होईल आणि शहर किंवा बाहेरून येणा ऱ्या लोकांना या स्मारकाला दिवसभर भेट देता येईल. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन अशी मागणी करणार असल्याचे खेडेकर यांनी सांगितले. या स्मारकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची लोककल्याणकारी राजा ही प्रतिमा जोपासली गेली पाहिजे. त्यांचा पुतळा सिंहासनावर बसलेला आणि मेघडंबरीतलाच असावा, असा आग्रहही खेडेकर यांनी धरला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा