विधान परिषद पोटनिवडणूकः काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव विरुद्ध भाजपच्या संजय केणेकरांत लढत

0
1316
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः काँग्रेसचे गटनेते डट. शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी येत्या २९ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होत असून या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने दिवगंत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपने औरंगाबादचे संजय केणेकर यांना उमेदवारी दिली आहे. केणेकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. डॉ. प्रज्ञा सातव उद्या मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

संजय केणेकर हे औरंगाबादेतील भाजप नेते आहेत. ते औरंगाबादचे उपमहापौरही राहिले आहेत. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदी भाजप नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपकडून मैदानात उतरलेले दोन्ही उमेदवार मराठवाड्यातील आहेत. काँग्रेस उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव या हिंगोलीच्या तर भाजप उमेदवार संजय केणेकर हे औरंगाबादचे आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील या दोन उमेदवारांमध्ये होणारी ही लढत लक्षणीय ठरणार आहे.

चला उद्योजक बनाः राज्यात औद्योगिकदृष्ट्या अविकसित, विकसनशील भागांसाठी पीएसआय योजना, कसा घ्यायचा लाभ?

या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्या उद्या मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान होणार आहे. काँग्रेस उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव यांना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप चमत्कार करणार काय? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

पक्षीय बलाबल पाहता महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव सहजपणे बाजी मारतील, अशी शक्यता आहे. या पोटनिवडणुकीत निवडून येणारा उमेदवार जुलै २०२४ पर्यंत विधान परिषदेचा सदस्य असेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा