राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर, प्रज्ञा सातव यांची लागणार वर्णी?

0
1246
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: भारत निवडणूक आयोगाने देशातील विविध कारणांनी रिक्त झालेल्या राज्यसभेच्या पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. स्व. राजीव शंकरराव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यातील एका जागेचाही यात समावेश आहे. राज्याच्या विधानसभेच्या सदस्यांद्वारे निवडून द्यायच्या या जागेच्या पोटनिवडणूकीसाठी बुधवार, १५ सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी केली जाणार आहे. सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेची मुदत २ एप्रिल २०२६ पर्यंत आहे. या पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी केल्याच्या दिनांकापासून २२ सप्टेंबरपर्यंत नामनिर्देशन दाखल करता येणार आहे. दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ सप्टेंबर रोजी केली जाणार असून उमेदवारांना सोमवार २७ सप्टेंबरपर्यंत नामनिर्देशन मागे घेता येईल. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान घेतले जाणार असून त्याच दिवशी सायं. ५ वा. मतमोजणी केली जाणार आहे.  या निवडणुकीसाठी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. या निवडणुकीप्रसंगी कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत.

 सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. या जागेवर निवडून येणाऱ्यास पाच वर्षांचा कालावधी मिळणार आहे. सातव यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीत त्यांना उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. सातव हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय होते. त्यामुळे प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा