कौशल दिपांकर/ मुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकारचा पहिलावहिला महाविस्तार उद्या सोमवारी होत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडे गृहमंत्रिपदाबरोबरच उपमुख्यमंत्रिपदाचीही धुरा जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तरूण फायरब्रँड नेते धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची श्कयता असून मुंडे यांच्याकडे अर्थ तर जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्रालयाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून स्थापन केलेल्या महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच राहील, असे आधीपासूनच ठरलेले होते. मात्र गृह मंत्रिपद कोणाकडे राहील यावरून सरकार स्थापनेपासूनच बराच खल सुरु आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तारही लांबत गेला आहे. उद्या सोमवारी दुपारी 1 वाजता विधान भवन परिसरात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री तर काँग्रेसचे 8 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री असे एकूण 36 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. रविवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस नेत्यांची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होऊन मंत्रिमंडळात संधी द्यावयाच्या आमदारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर दूरध्वनीद्वारे त्या आमदारांना सोमवारच्या शपथविधीसाठी हजर रहाण्याचे सांगण्यात आले. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर होणाऱ्या खातेवाटपात राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृह, अर्थ, पाटबंधारे, ग्रामविकास आणि सामाजिक न्याय ही महत्वाची खाती रहाणार असून या खात्यांची जबाबदारी कोणावर सोपवायची, हेही निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानुसार अजित पवारांकडे उपमुख्यमंत्रिपदाबरोबरच गृह, परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्याकडे अर्थ, छगन भुजबळ यांच्याकडे ग्रामविकस तर जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सामाजिक न्याय खात्याची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. आघाडी सरकारच्या काळात ज्या पाटबंधारे खात्यातील कथित घोटाळ्याचा बाऊ करून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून 2014 ची विधानसभा निवडणूक जिंकली होती, हे खाते जयंत पाटील या शांत व अभ्यासू नेत्याकडे सोपवण्याचा निर्णयही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांनी प्रादेशिक समतोल राखूनच मंत्रिपदासाठी नावे निश्चित केल्याचे सांगण्यात येते.
उद्या शपथ घेणाऱ्या संभाव्य मंत्र्यांची पक्षनिहाय यादी अशीः
राष्ट्रवादी काँग्रेसः अजित पवार, धनंजय मुंडे, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, डॉ. राजेंद्र शिंगणे, नवाब मलिक, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, दत्ता भरणे, आदिती तटकरे, डॉ. किरण लहामटे, सरोज अहिरे.
शिवसेनाः संजय शिरसाठ,अब्दुल सत्तार किंवा तानाजी सांवत, अनिल परब, सुनील राऊत, सुनिल प्रभू, रविंद्र वायकर, संभुराजे नाईक, उदय सामंत, भास्कर जाधव किंवा वैभव नाईक, आशिष जैस्वाल किंवा संजय रायमुलकर, बच्चू कडू, संजय राठोड, प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील, दादा भुसे किंवा सुहास कांदे.
काँग्रेसः अशोक चव्हाण, अमित देशमुख, विश्वजित कदम, के.सी. पडवी, संग्राम थोपटे, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, अमिन पटेल, सुनिल केदार.