जड वाहनांच्या टोलदरात १० टक्के वाढ; कार, जीप, एसटी, स्कूलबसची सवलत कायम

0
74
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई राज्यातील जड वाहनांच्या टोलमध्ये दरवाढ करण्यात आली आहे. टोल कंपन्यांना होणारे नुकसान भरून काढण्यासाठी जड वाहनांच्या टोलदरांमध्ये १० टक्के वाढ करण्यात आली आहे. या टोलदरवाढीला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, या टोलदरवाढीतून कार, जीप, एसटी व स्कूल बस तसेच हलकी वाहने यांची सूट कायम ठेवण्यात आली आहे.

राज्यात सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत राज्यातील १५ प्रकल्पांतर्गत वाहनांना टोलमधून सूट देण्यात येते. ही सूट दिल्यामुळे टोल कंपन्यांना दरवर्षी ३५० ते ४०० कोटींची नुकसान भरपाई राज्य सरकारला द्यावी लागत आहे. सध्या कोरोनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. लॉकडाउनच्या काळात सर्व व्यवहार ठप्प असल्याने राज्याच्या महसूलात प्रचंड घट झाली आहे.  त्यामुळे टोल कंपन्यांना ही भरपाई रोखीने न देता जड वाहनांवरील टोल काही प्रमाणात वाढवण्याचा पर्याय राज्य सरकारने स्वीकारला आहे. जड वाहनांना १० टक्के टोल दरवाढ करण्यात आली असली तरी वाढीव दर हे राष्ट्रीय महामार्गावरील टोलपेक्षा कमीच असणार आहेत. ही दरवाढ केवळ जड वाहनांनाच असल्याने सर्वसामान्यांना त्याचा फटका बसणार नाही.

यापूर्वी टोल वसुल करण्यासाठी वाहनांचे चार प्रकार होते. आता त्यात नव्याने ट्रक ट्रेलर, तीन पेक्षा अधिक आसांची वाहने असा प्रकार समाविष्ट करण्यात आला आहे. पूर्वी कार, जीप, टाटा सुमो, कमांडर, ट्रॅक्स, वाहनचालक वगळून ६ आसनी प्रवासी रीक्षा व इतर तत्सम, मिनी बस किंवा तत्सम वाहने, २ आसांचे ट्रक, बस, ३ आसांची अवजड वाहने असे चार प्रकार होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा