कोरोनाची लस घेतल्यामुळे नपुंसकत्व येते का?, डीसीजीआयने दिले असे स्पष्टीकरण…

0
240
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः भारतात ऑक्सफर्ड- सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन या कोरोनावरील दोन्ही लसींच्या आपत्कालीन वापरास डीसीजीआयने मंजुरी दिली आहे. मात्र कोरोनावरील लस घेतल्यामुळे नपुंसकत्व येते असा दावा समाजवादी पक्षाचे नेते आशुतोष सिन्हा यांनी केला आहे. मात्र औषध महानियंत्रकांनी हा दावा फेटाळून लावला असून या दोन्ही लसी शंभर टक्के सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.

कोरोना लसीकरणाची देशभरात जोरदार तयारी करण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून कालच देशातील सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांत कोरोना लसीकरणाचा ड्राय रन पार पडला असतानाच कोरोनाच्या लसींबाबत विविध वक्तव्ये केली जात आहेत. त्यामुळे देशात या लसींबाबत संभ्रमाची अवस्था निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर डीसीजीआयने महत्वाचा खुलासा केला आहे.

हेही वाचाः मोठी घोषणाः कोविशिल्ड, कोव्हॅक्सीन लसींच्या आपत्कालीन वापरास डीसीजीआयची मंजुरी

 भाजपच्या कोरोना लसीवर आम्ही विश्वास कसा ठेवायचा, असे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी म्हटले होते. त्यानंतर समाजवादी पक्षाचेच नेते आशुतोष सिन्हा यांनी कोरोना लस घेतल्यामुळे नपुंसकत्व येते, असे वादग्रस्त विधान केले आहे. त्यावर डीसीजीआयचे व्ही.जी. सोमाणी म्हणाले की, आम्ही अशा कोणत्याही लसीला संमती देणार नाही, जी नपुंसकत्व आणते. या दोन्ही लसी शंभर टक्के सुरक्षित आहेत. लस घेतल्याने नपुंसकत्व येते, असे म्हणणे साफ चुकीचे आहे. अशा मुर्खपणाच्या वक्तव्यांकडे लक्ष देऊ नये, असे सोमाणी म्हणाले.

हेही वाचाः लस घेतली म्हणजे कोरोनामुक्त झालो अशी गफलत बाळगू नकाः आरोग्यमंत्री टोपेेंचा इशारा

काय म्हणाले होते आशुतोष सिन्हाः आशुतोष सिन्हा हे समाजवादी पक्षाचे मिर्झापूरचे विधान परिषद सदस्य आहेत. कोरोना लसीमध्ये काही तरी असे असू शकते की, त्यामुळे नुकसान होईल. उद्या लोक म्हणतील वॅक्सीन लोकसंख्या कमी करण्यासाठी किंवा मारण्यासाठी दिली गेली आहे. तुम्ही नपुंसकदेखील होऊ शकता. काही पण होऊ शकते, असे विधान आशुतोष सिन्हा यांनी केले होते.

आता अखिलेश यादव म्हणतात, लसीकरणाची तारीख ठरवाः भाजपच्या लसीवर आम्ही विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल करत मी आताच लसीकरण करून घेणार नाही, असे सांगणारे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मात्र आता आपला सूर बदलला आहे. कोरोनाचे लसीकरण ही एक संवेदनशील प्रक्रिया असून भाजप सरकारने लसीकरण हे सजावटीचा किंवा दिखाव्याचा इव्हेंट समजू नये. आगोदर संपूर्ण व्यवस्था करूनच लसीकरणाची सुरुवात करावी. हा लोकांच्या जीवनाचा विषय आहे. यामध्ये नंतर सुधारणेची जोखीम पत्करता येत नाही. गरिबांच्या लसीकरणाची निश्चित तारीख जाहीर झाली पाहिजे, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा