न्यूजटाऊन इम्पॅक्टः ‘संघाचे निष्ठावान स्वयंसेवक कोश्यारींच्या उपस्थितीतील दीक्षांत समारंभ रद्द करा’

0
293
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः महाराष्ट्राचे राज्यपाल आणि राज्यातील विद्यापीठांचे कुलपती भगतसिंह कोश्यारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक असून त्यांच्या उपस्थितीत होणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ रद्द करा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या उपस्थितीत होणारा ‘रिव्हिजिंट गांधी’ हा कार्यक्रम पुणे विद्यापीठाने रद्द केल्यामुळे राज्यातील संघधार्जिण्या कुलगुरू आणि उपकुलगुरूंची हकालपट्टी करा, अशी मागणी झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपतीच संघाचे निष्ठावान स्वयंसेवक असल्याचे बिरूद राजभवनाच्या अधिकृत संकेतस्थळावर मिरवत असल्याचे वृत्त न्यूजटाऊनने दिले होते. त्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचाः संघधार्जिण्या कुलगुरूंच्या हकालपट्टीची मागणी, पण विद्यापीठांचे कुलपतीच संघाचे निष्ठावान स्वयंसेवक!

११ फेब्रुवारी रोजी औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ असून राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. कोश्यारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक असून आपण संघ विचारसरणीच्या व्यक्तीस दीक्षांत समारंभाला बोलावून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालणाऱ्या आणि पुरोगामी विचारांची बूज राखणाऱ्या विद्यापीठाचा अवमान केला आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचासरणीला अनुसरून चळवळीचे केंद्र असलेल्या विद्यापीठात संघधार्जिण्या व्यक्तीला का बोलावले?  असा सवाल करत कोश्यारी यांच्या उपस्थितीत होणारा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ रद्द करावा अन्यथा पुरोगामी विचारसरणीचे सर्व पदवीधर या दीक्षांत समारंभावर बहिष्कार टाकतील, असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अमोल दांडगे, दीक्षा पवार आणि मयुर सोनवणे यांनी विद्यापीठाचे कुलगुरू आणि औरंगाबादच्या पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा