न्यूजटाऊन इफेक्टः प्रा. नागनाथ तोटावाड यांचे सेट प्रमाणपत्र रद्द कराः ‘बामु’चे पुणे विद्यापीठाला पत्र

0
538
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः सहायक प्राध्यापकपदासाठी अनिवार्य असलेली सेट परीक्षा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून उत्तीर्ण होऊन इतर मागास वर्गासाठी (ओबीसी) आरक्षित असलेल्या जागेवर इंग्रजी विषयातील सहायक प्राध्यापकाची नोकरी मिळवणारे विवेकानंद कला आणि सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. नागनाथ तोटावाड यांच्या फसवाफसवीचा शेवटचा अंक आता जवळ आला आहे. प्रा. तोटावाड यांचे सेट प्रमाणपत्रच रद्द करा, अशी विनंती करणारे पत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला लिहिले आहे. त्यामुळे आता पुणे विद्यापीठाच्या कारवाईनंतर प्रा. डॉ. तोटावाड यांना सहायक प्राध्यापक म्हणून मिळालेली मान्यता रद्द होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. न्यूजटाऊनने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे.

औरंगाबादच्या विवेकानंद कला आणि सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा. डॉ. नागनाथ रामराव तोटावाड हे २९ सप्टेंबर २००३ रोजी एसटी प्रवर्गातून इंग्रजी विषयातील सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांचा सेट परीक्षेचा आसन क्रमांक ०२८०४ असून पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षेच्या वेबसाईटवर हा डेटा उपलब्ध आहे.

हेही वाचाः फसवाफसवीचे कोण कोण भागीदार?: प्रा. तोटावाड यांना उच्च शिक्षण सहसंचालक, विद्यापीठाचे अभय?

२००५ मध्ये औरंगाबादच्या विवेकानंद कला आणि सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात निघालेल्या नोकर भरतीच्या जाहिरातीसाठी नागनाथ तोटावाड यांनी ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या इंग्रजी विषयाच्या अधिव्याख्यातापदासाठी (सध्याचे सहायक प्राध्यापक पद) अर्ज केला. त्यांची दिनांक २९ ऑगस्ट २००५ रोजी पूर्णवेळ अधिव्याख्याता म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांच्या नियुक्तीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दिनांक ३ ऑक्टोबर २००५ रोजी मान्यताही दिली. त्यानंतर प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांना ६ ऑगस्ट २०१२ रोजी सीएएस अंतर्गत सहायक प्राध्यापक पदासाठी मंजुरीही देण्यात आली.

हेही वाचाः पुणे विद्यापीठानेही उघड केली प्रा. तोटावाड यांची बनवाबनवी, एसटीचे जातप्रमाणपत्र आणले समोर

विशेष बाब म्हणजे प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होऊन पुणे विद्यापीठाची सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नांदेडच्या उपजिल्हाधिकारी आणि विशेष भूसंपादन अधिकारी कार्यालयातून २५ ऑगस्ट २००४ रोजी इतर मागास प्रवर्गात असलेल्या कुलेकडगी जातीचे प्रमाणपत्र प्राप्त केले. विवेकानंद कला आणि सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील नोकरीसाठी प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांनी ओबीसी प्रवर्गातील राखीव जागेसाठी नियुक्ती मिळवल्यामुळे महाविद्यालयाने त्यांच्या जातप्रमाणपत्र पडताळणीचा प्रस्ताव २० फेब्रुवारी २००६ रोजी औरंगाबाद विभागाच्या जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडे पाठवला. जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने २५ जुलै २००६ रोजी प्रा. नागनाथ तोटावाड यांचा कुलेकडगी (इतर मागास वर्ग) जातीचा दावा वैध ठरवला आणि आणि त्यांना जातप्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र बहाल केले.

हेही वाचाः  पुरूषोत्तम ‘अर्थ’शास्त्रः ना पदासाठी अर्ज, ना मुलाखत पत्र; तरीही देशमुखांची अधिव्याख्यातापदी नियुक्ती!

एसटी प्रवर्गातून सेट उत्तीर्ण झालेल्या प्रा. नागनाथ तोटावाड यांना ओबीसी प्रवर्गातील आरक्षित जागेवर नोकरी कशी मिळाली? याबाबतची तक्रार रिपाइंचे मराठवाडा प्रदेश युवक अध्यक्ष नागराज गायकवाड यांनी तक्रार केली होती. या तक्रारीसोबत त्यांनी तोटावाड यांची कागदपत्रेही जोडली होती. आता प्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ एकदाचे हलले आणि त्यांनी पुणे विद्यापीठाला प्रा. तोटावाड यांचे सेट प्रमाणपत्र रद्द करण्याची विनंती करणारे पत्र लिहिले आहे.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड हे २ सप्टेंबर २००५ पासून ओबीसी प्रवर्गातून इंग्रजी विषयाचे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना नांदेडचे उपजिल्हाधिकारी आणि जातवैधता पडताळणी समितीने कुलेकडगी जातीचे ओबीसी प्रवर्गाचे जातप्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्रही निर्गमित केले आहे. त्यामुळे तोटावाड यांचा जात प्रवर्गा ओबीसी असल्याची या कार्यालयाची धारणा झाली आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

 प्रा. तोटावाड यांनी कोया या अनुसूचित जमातीचे जातप्रमाणपत्र तालुका दंडाधिकारी भोकर यांच्याकडून संपादित केले असून सेट परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आपल्या कार्यालयाला सादर केले आहे. प्रा, तोटावाड यांचे कोया जातीचे प्रमाणपत्र अनधिकृत असल्याचे प्रथम दर्शनी या कार्यालयाचे मत झाले आहे. त्यामुळे त्यांनी कोया जातीचा घेतलेला लाभ अवैध असल्यामुळे  त्यांना जात प्रमाणपत्र निर्गमित केलेल्या प्राधिकरणाकडून त्याची वैधता तपासून आपल्या स्तरावरून संबंधित उमेदवाराने संपादित केलेले सेट परीक्षा उत्तीर्णचे प्रमाणपत्र रद्द करावे, अशी शिफारस या पत्रात करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिवांनी पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागाच्या सहायक कुलसचिवांना  ७ जानेवारी रोजी हे पत्र पाठवले आहे. त्यामुळे आता प्रा. तोटावाड यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांच्या नोकरीवरील गंडांतर निश्चित मानले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा