राज ठाकरेंच्या विरोधात औरंगाबादेत गुन्हा दाखल, भोंग्यांविरुद्ध चिथावणी परंतु स्वतःचाच भोंगा मोठा!

0
4
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबाद/मुंबईः मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबादेतील सभेच्या वेळी पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्या विरोधात  औरंगाबादच्या सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी या सभेच्या वेळी नियम व अटींचे पालन केले नाही आणि नियम मोडल्यामुळे  तीन कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी या सभेत मशिदीवरील भोंग्याविरुद्ध चिथावणी दिली, परंतु त्यांच्या स्वतःच्याच भोंग्याचा आवाज मोठा असल्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१ मे रोजी राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेतली. या सभेला परवानगी देण्यावरूनही बराच खल आणि वाद झाला होता. अखेर औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांच्या या सभेला परवानगी दिली खरी परंतु परवानगी देताना पोलिसांनी राज ठाकरे यांना १६ अटी घातल्या होत्या. राज ठाकरे यांनी सभेच्या वेळी पोलिसांनी घालून दिलेल्या बहुतांश अटींचे उल्लंघन केले. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गजानन इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनसे प्रमुख राज ठाकरे, या सभेचे आयोजक राजीव जेवळीकर व इतरांविरुद्ध गुरनं १२७/२०२२ कलम ११६, ११७, १५३ भादंवि सह महराष्ट्र पोलिस कायदा १९५१ सुधारित ३१ जुलै २०१७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिटी चौकचे पोलिस निरीक्षक अशोक गिरी हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सभेसाठी १५ हजार लोकांच्या उपस्थितीची मर्यादा, सभेत भोंग्याच्या आवाजाची मर्यादा, आक्षेपार्ह वक्तव्य न करणे, चिथावणीखोर वक्तव्य न करणे अशा अनेक अटी औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे आणि आयोजकांवर या सभेसाठी घातल्या होत्या. मात्र या अटींचे उल्लंघन करत राज ठाकरे यांनी चिथावणीखोर आणि आक्षेपार्ह भाषण केले. याच सभेत त्यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी ४ तारखेचा अल्टिमेटम दिला. मशिदीवरील भोंगे काढले नाही तर मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा पठण करून असा इशाराही राज ठाकरे यांनी या सभेत दिला.

भोंग्याविरुद्ध चिथावणी, परंतु स्वतःचाच भोंगा मोठाः मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या आवाजाविरुद्ध राजकीय लाभासाठी रान उठवले आहे. मात्र राज ठाकरे यांनी स्वतःच्याच सभेत भोंग्याच्या ( लाऊडस्पिकर) आवाजाची मर्यादा पाळली नाही. पोलिसांनी राज ठाकरेंच्या सभेसाठी ज्या १६ अटी घातल्या होत्या, त्यात भोंग्याचा आवाज मर्यादित ठेवण्याची अटही होती. मात्र राज ठाकरे यांनी ही अटही पाळली नाही. दुसऱ्याच्या भोंग्याच्या आवाजाचा वीट येणाऱ्या राज ठाकरेंना आपला भोंगा का मर्यादित ठेवता आला नाही? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

भावावर देशद्रोहाचा गुन्हा कसा लावायचा, असे मुख्यमंत्र्यांना वाटते का?- जलीलः राज ठाकरे यांच्या सभेप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये अत्यंत सौम्य कलमे लावण्यात आली आहेत. कायद्याच्या जाणकारांच्या मते ही अतिशय सौम्य कलमे आहेत. यात सहज जामीन मिळू शकतो. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे हाच त्या सभेचा उद्देश होता. हे अतिशय गंभीर आहे, अशा शब्दात एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. नवनीत राणांप्रमाणेच राज ठाकरे यांच्यावर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा. राज ठाकरे यांनी नवनीत राणांपेक्षा वेगळे काय केले?  मुख्यमंत्र्यांना वाटतेय का की हा माझा भाऊ आहे. मी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा कसा दाखल करू?  तुम्हा दाखवण्यासाठी काहीतरी थातूरमातूर कलम लावली आहेत, असे राज्यातील जनतेला वाटत असल्याचे जलील म्हणाले.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कटः राज ठाकरे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कट आखण्यात आल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिला आहे. इतर राज्यातील लोक महाराष्ट्रात येऊन कायदा व सुव्यवस्था बिघडवू शकतात अशी माहिती गुप्तचर विभागाला मिळाली असल्याचे गृह विभागाने म्हटले आहे.

कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका-मुख्यमंत्र्यांचे निर्देशः राज ठाकरे यांनी ४ मे रोजी मशिदीसमोर दुप्पट आवाजात भोंगे लावून हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकीनंतर पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी या प्रकरणी पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईची माहिती दिली. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला असून पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले आहेत. कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका, असे निर्देशही ठाकरे यांनी पोलिसांना दिले.

एसआरपीच्या ८७ तुकड्या आणि ३० हजारांहून जास्त होमगार्ड तैनातः राज ठाकरे यांनी जाहीर केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करू. आम्ही मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून नोटिसाही पाठवल्या आहेत. १५ हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर १३ हजार लोकांना नोटिसा पाठवल्या आहेत. एसआरपीएफच्या ८७ तुकड्या आणि ३० हजारांहून अधिक होमगार्ड्स तैनात करण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था राखावी, असे निर्देश त्यांना देण्यात आल्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

अल्टिमेटमचे राजकारण चालणार नाही-राऊतः महाराष्ट्रविरोधी षडयंत्र सुरू आहे. राज्याबाहेरील लोक येथे आणून दंगली घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्वतःची ताकद नाही, तर बाहेरून लोक आणून महाराष्ट्रात अस्थिरता आणि बेकायदेशीर कृत्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अल्टिमेटमचे राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही. येथे केवळ ठाकरे सरकारचा शब्द चालेल, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले. व्यक्ती कितीही मोठी असू द्यात, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कुणी केला तर कारवाई होणारच असा इशाराही त्यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा