अनिल देशमुखांच्या वकीलाला अटक,’क्लीन चिट’ अहवाल फुटी प्रकरणी सीबीआयची कारवाई

0
224
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणातील त्यांना ‘क्लीन चिट’ देणारा प्राथमिक चौकशी अहवाल फुटल्याप्रकरणी सीबीआयने आपल्याच चौकशी पथकातील उपनिरीक्षक अभिषेक तिवासी यांना अटक केल्यानंतर आज अनिल देशमुखांचे वकील आनंद डागा यांना अटक केली.

 मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये वसुलीचे आरोप केले होते. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयने प्राथमिक चौकशी केली होती. हा प्राथमिक चौकशी अहवाल फुटला होता. या प्राथमिक चौकशी अहवालात अनिल देशमुख यांच्याविरोधात दखलपात्र गुन्ह्याचे पुरावे नसल्यामुळे ही केस बंद करण्यात यावी, अशी शिफारस सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याने केली होती. हा ६७ पानी प्राथमिक चौकशी अहवाल फुटल्यानंतर तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

अभिषेक तिवारी यांनीच अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांना प्राथमिक चौकशी अहवाल दिला होता, असे सीबीआयचे म्हणणे आहे. तत्पूर्वी सीबीआयने देशमुखांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि वकील आनंद डागा यांना बुधवारी सायंकाळी अचानक ताब्यात घेतले होते.

आनंद डागा यांना दिल्लीला नेण्यात आले असून तेथेच त्यांना अभिषेक तिवारी यांच्यासोबत न्यायालयात हजर केले जाणार आहे. डागा यांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांना ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला आणण्यात आले आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाईल, असे सीबीआयचे प्रवक्ते आर.सी. जोशी यांनी सांगितले.

सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी हे देशमुखांचे वकील आनंद डागा यांच्या संपर्कात होते. देशमुखांच्या निकटवर्तीयांकडून त्यांनी लाच स्वीकारून प्राथमिक चौकशी अहवाल लीक केला होता, असे सूत्रांचे म्हणणे आहे. बुधवारी सायंकाळी गौरव चतुर्वेदी आणि आनंद डागा हे दोघे वरळीतील आपल्या घराबाहेर गाडी घेऊन निघताच सीबीआयच्या एका पथकाने त्यांची गाडी अडवून त्यांना ताब्यात घेतले होते. गौरवची चौकशी केल्यानंतर सीबीआयने त्यांना सोडून दिले तर देशमुखांचे वकील आनंद डागा यांची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

 सीबीआयच्या चौकशी पथकातील उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांनीच अनिल देशमुख प्रकरणातील प्राथमिक चौकशी अहवाल वकील आनंद दवे यांच्यासोबत शेअर केला होता, अशी सीबीआयला शंका आहे. हा प्राथमिक चौकशी अहवाल सोशल मीडियावर लीक करण्यात आला होता. त्यामुळे अनिल देशमुख यांना प्रचंड सहानुभूती मिळाली होती. अनिल देशमुखांचे जावई गौरव चतुर्वेदी, आनंद डागा आणि उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांच्यावरील कारवाई बरोबरच सीबीआयने दिल्ली आणि अलहाबादेत छापेमारीही केली होती. ही दोन्ही ठिकाणे अभिषेक तिवारीशी संबंधित आहेत.

हा वेगळा गुन्हा नाही का?- सावंतः जर अनिल देशमुखांच्या जावयांना प्राथमिक अहवाल फुटीप्रकरणी सीबीआयने उचलून नेले का वेगळा गुन्हा नाही का? जर हा वेगळा गुन्हा असेल तर त्यांना राज्य सरकार किंवा उच्च न्यायालयाच्या परवानगीची गरज नाही का?, असे सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहेत. सीबीआय दिल्ली विशेष पोलिस कायद्यानुसार काम करते. गुन्ह्यांचा तपास ही राज्य सरकारच्या अधिनस्त बाब आहे. जर अहवाल लीक झाला असेल तर सीबीआय राज्य पोलिसांकडे एफआयआर दाखल करू शकते. ते कोणालाही ताब्यात घेऊ शकत नाहीत. महाविकास आघाडी सरकारने यात हस्तक्षेप करून या प्रकरणात काही बेकायदेशीर घडले आहे का, हे पहावे, असे सावंत यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा