अनिल देशमुखांना क्लीनचिट?: सीबीआयने दिले स्पष्टीकरण, मात्र व्हायरल कागदपत्रांवर मौन!

0
381
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या आरोप प्रकरणी सीबीआयने प्राथमिक चौकशी अहवालात क्लीनचिट दिली आणि या प्रकरणाची फाइल बंद करण्याची शिफारस केली आहे, अशा आशयाच्या गोपनीय अहवालातील कागदपत्रे समोर आल्यानंतर राज्याचे राजकारण तापले असतानाच सीबीआयने या प्रकरणी आता खुलासा केला आहे.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत आम्हाला अनेकांकडून विचारणा होत आहे. त्यामुळे आम्ही वस्तुस्थिती आपल्या निदर्शनास आणून देत आहोत. मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी अनेक याचिका दाखल होत्या. त्यावरून उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यास सांगितले होते. ही प्राथमिक चौकशी आम्ही केली आणि त्या चौकशीत आढळलेल्या पुराव्यांच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सीबीआयने २१ एप्रिल रोजी एफआयआर दाखल केला आणि त्याची प्रत २४ एप्रिलपासून सीबीआयच्या अधिकृत बेवसाईटवर उपलब्ध आहे. या प्रकरणात अजूनही तपास सुरू आहे, असे सीबीआयने म्हटले आहे.

  अनिल देशमुख प्रकरणी सीबीआयच्या प्राथमिक चौकशी अहवालाची जी पीडीएफ फाईल व्हायरल झाली आहे, त्याबाबत सीबीआयकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही किंवा स्पष्टीकरणात त्याचा उल्लेखही करण्यात आलेला नाही. त्यामुळे व्हायरल झालेली कागदपत्रे खरी आहेत की खोटी हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.

व्हायरल कागदपत्रात काय?: अनिल देशमुख यांची चौकशी ही जाणीवपूर्वक आणि आकस ठेवून करण्यात येत असून सीबीआयच्या उपधीक्षकांनाच देशमुख यांच्यावरील आरोपात तथ्य वाटत नसल्याचे सूचवणारी पीडीएफ स्वरुपातील कागदपत्रे समाजमाध्यमात गेल्या दोन दिवसांपासून फिरत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार प्राथमिक तपासात दखलपात्र गुन्हा असल्याचे निदर्शनास आले तरच एफआयआर दाखल करता येतो. अनिल देशमुख प्रकरणात सीबीआयचे उपअधीक्षक आणि या प्रकरणाचे तपास अधिकारी आर. एस. गुंजाल यांनी १५ दिवसांच्या सखोल चौकशीनंतर अनिल देशमुखांवरील आरोपांत काहीच तथ्य नसल्याने चौकशी बंद करण्याची शिफारस केली होती. परंतु ही बाब न्यायालयासमोर मांडण्यात आलीच नाही. तपास अधिकाऱ्याची शिफारस  डावलून एफआयआर नोंदवला गेला, असा दावा या कागदपत्रांत करण्यात आला आहे.

अनिल देशमुख यांना अडचणीत आणण्यासाठीच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले, असा निष्कर्षही या कागदपत्राच्या आधारे काढण्यात येत आहे. याच कागदपत्रातील एक पेज ट्विट करून सचिन सावंत यांनी अनिल देशमुखांना प्राथमिक तपासातच सीबीआयने क्लीनचिट दिल्याचा दावा केला आहे. सचिन सावंत यांच्या या दाव्यावरून आता महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.

 राष्ट्रवादीने केली होती मागणीः अनिल देशमुखांबाबतचे नेमके सत्य असत्य काय? याचा खुलासा सीबीआयनेच करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली होती. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने प्राथमिक तपासातच क्लीनचिट दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. यावर नबाव मलिक यांनी सीबीआयला जबाबदारीची जाणीव करून दिली होती. अनिल देशमुख यांच्या प्रकरणातील प्राथमिक चौकशी अहवालाच्या बातम्या समोर आल्या आहेत. हा अहवाल सत्य की असत्य यावर आम्ही भाष्य करत नाही. त्याचा खुलासा सीबीआयनेच करावा. हा अहवाल सीबीआयच्या फाईलमधील आहे की बनावट आहे, याचा खुलासा करण्याची जबाबदारी सीबीआयची आहे, असे मलिक यांनी म्हटले होते.

हा विषय गंभीर आहे. एखाद्या व्यक्तीवर आरोप झाले. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. जर हे कागद सत्य आणि त्या फाईलमधील असतील तर यापेक्षा राजकीय सूडबुद्धीने केलेली कुठलीही कारवाई होऊ शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाचा खुलासा सीबीआयनेच करावा, असे मलिक यांनी म्हटले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा