रस्ते कामात कमिशनखोरीः मराठवाड्यातील २२ आमदार, खासदारांना सीबीआय चौकशीच्या नोटिसा

0
3173
प्रातिनिधिक छायाचित्र.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्ह/ औरंगाबादः राष्ट्रीय महामार्गाची कामे करत असलेल्या कंत्राटदाराला काम सुरू होण्याआधीच कमिशनची मागणी करून भंडावून सोडणाऱ्या मराठवाड्यातील २२ आमदार आणि खासदारांना सीबीआयने चौकशीच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे कमिशनखोर आमदार- खासदारांचे धाबे दणाणले असून आता ही चौकशी टाळण्यासाठी त्यांनी पक्षश्रेष्ठींचे उंबरठे झिजवण्यास सुरूवात केली आहे. त्यापैकी बीड जिल्ह्यातील एक आमदार नवी दिल्लीत तळ ठोकून बसले आहेत.

कल्याण- विशाखापट्टणम आणि खामगाव- पंढरपूर हे दोन राष्ट्रीय महामार्ग मराठवाड्यातून जात आहेत. एल ऍण्ड टी आणि दिलीप बिल्डकॉन या कंत्रांटदारांमार्फत या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. कल्याण- विशाखापट्टणम हा ६१ सी क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग अहमदनगर, पाथर्डी, गढी, माजलगाव, पाथ्री, परभणी, नांदेड  असा जातो. तर खामगाव- पंढरपूर हा ५३० क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग लोणार, मंठा,परतूर, कळंब, आष्टी, माजलगाव, तेलगाव, धारूर, बार्शी, पंढरपूर असा जातो.

हे दोन्ही राष्ट्रीय महामार्ग ज्या आमदार- खासदारांच्या मतदारसंघातून जातात त्यापैकी काही जणांनी या महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना चक्क २० टक्के कमिशनची मागणी केली होती.

विशेष म्हणजे महाराष्ट्रात रस्ते विकासाची कामे करत असताना अनेक आमदार आणि खासदार रस्ते कंत्राटदारांकडून कमिशन मागतात, अशा असंख्य तक्रारी येत असल्याचे सांगत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पुणे विभागातील काही आमदार, खासदारांची चौकशी करण्याची शिफारस सीबीआय संचालकांकडे केली होती. गडकरी यांनी सक्तवसुली संचालनालयालाही चौकशीची शिफारस करणारे पत्र दिले होते. कंत्राटदारांनीही लोकप्रतिनिधींच्या कमिशनखोरीच्या तक्रारी केल्यानंतर आता सीबीआयने या कमिशनखोर आमदार, खासदारांना चौकशीच्या नोटिसा बजावल्या असून त्यात मराठवाड्यातील २२ आमदार-खासदारांचा समावेश असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

आम्हाला कमिशन दिले नाही तर आम्ही राष्ट्रीय महामार्गाचे काम होऊ देणार नाही, अशा धमक्या या आमदार, खासदारांकडून या दोन्ही महामार्गांचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना देण्यात होत येत्या. लोकप्रतिनिधींच्या या धमक्यांमुळे रस्ते विकासाच्या कामात मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासापेक्षा स्वतःचे खिसे भरण्याचा संकल्प राबवणाऱ्या या आमदार, खासदारांच्या पाठीमागे आता सीबीआय चौकशीचा फेरा लागला आहे. सीबीआय चौकशी पाठोपाठच या आमदार, खासदारांना ईडीच्या चौकशीलाही सामोरे जावे लागणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

 मराठवाड्यातील काही आमदार, खासदारांना सीबीआय चौकशीच्या नोटिसाही प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे धाबे दणाणले असून हा चौकशीचा फेरा टाळण्यासाठी अनेकांनी दिल्लीची वाट धरली आहे. नोटीस मिळाल्यामुळे बीड जिल्ह्यातील एक आमदार आता नवी दिल्लीत तळ ठोकून बसले आहेत. चौकशीचा हा फेरा टाळून बदनामी टळावी यासाठी ते पक्षश्रेष्ठींचे उंबरठे झिजवत असल्याचेही सांगण्यात येते.

सक्त इशाराः न्यूजटाऊनचा मजकूर कॉपी राइट कायद्यानुसार संरक्षित आहे. हा मजकुर पूर्णतः अथवा अंशतः कॉपी करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. न्यूजटाऊनच्या उल्लेखासह मजकूर वापरण्यास मात्र मुभा आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा