माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर सीबीआयचा गुन्हा: नागपुरातील निवासस्थानी ११ तास झडती सत्र

0
64

मुंबई/ नागपूरः महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने लाचखोरीच्या प्रकरणात गुन्हा दाखल करून शनिवारी त्यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवास्थानी छापे टाकले. देशमुखांच्या नागपुरातील निवासस्थानाची सीबीआयच्या पथकाने तब्बल ११ तास झाडाझडती घेतली. दरम्यान, सीबीआयच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून राजकीय हेतू साध्य करण्यासाठीच हे छापासत्र टाकण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर लावलेल्या लाचखोरीच्या आरोप प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने प्राथमिक चौकशी सुरू केली होती. या चौकशीत भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार देशमुख आणि अन्य अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू करण्यासाठी प्रथमदर्शनी पुरावे मिळाल्याचा दावा, सीबीआयच्या सूत्रांनी केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयने मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी केली. त्याच देशमुखांचे ज्ञानेश्वरी या निवासस्थानाचाही समावेश आहे. सीबीआयच्या पथकाने देशमुखांच्या नागपुरातील निवासस्थानीही छापेमारी केली.

सीबीआयचे एक पथक शुक्रवारी रात्रीच नागपुरात दाखल झाले होते. तेथे पथकाने देशमुखांच्या निवासस्थानाची तब्बल ११ तास झाडाझडती घेतली. नागपूरच्या सिव्हिल लाइन्स परिसरातील जीपीओ क्वेअरमध्ये देशमुखांचे घर आहे.

प्राथमिक चौकशी दरम्यान सीबीआयने देशमुखांसह त्यांच्या सहकाऱ्यांचीही चौकशी केली होती. त्यात त्यांचे स्वीय सहायक कुंदन शिंदे आणि खासगी सचिव संजीव पलांडे यांचाही समावेश होता. सीबीआयने परमबीर सिंग यांचाही जबाब नोंदवून घेतला आहे. परमबीर सिंग सध्या होमगार्ड्सचे महासंचालक आहेत. या प्रकरणात सध्या एनआयएच्या कोठडीत असलेले सचिव वाझे यांचाही जबाब सीबीआयने नोंदवून घेतला होता.

परमबीर सिंग यांनी त्यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरून उचलबांगडी केल्यानंतर तीन दिवसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आठ पानी पत्र लिहून देशमुखांनी निलंबित सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना मुंबईतील बार आणि हॉटेल्सकडून दरमहा १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितले होते. त्यात मुंबईतील १ हजार ७५० बार आणि रेस्टॉरंट्सचा समावेश आहे, असा आरोप केला होता.

मुंबई उच्च न्यायालयाने देशमुखांविरोधात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते. पंधरा दिवसांत ही प्राथमिक चौकशी पूर्ण करावी, असेही या आदेशात म्हटले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर देशमुखांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

पीपीई किट घालून केली झाडाझडतीः सीबीआयची पथके देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवास्थानी पीपीई किट घालूनच छापे मारण्यासाठी गेली होती. नागपुरातील निवासस्थानी ११ तास झाडाझडती घेऊन सीबीआयचे पथक बाहेर पडले. त्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु सीबीआय पथक बाहेर पडताच देशमुख माध्यमांना सामोरे गेले आणि त्यांनी आपण सीबीआय पथकाला चांगले सहकार्य केल्याचे सांगितले.

सीबीआयच्या कारवाईवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप

 प्राथमिक चौकशीच्या परवानगीचा दुरूपयोगः मुंबई उच्च न्यायालयाकडून मिळालेल्या प्राथमिक चौकशीच्या परवानगीचा दुरूपयोग करून सीबीआय राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. उच्च न्यायालयाने केवळ प्राथमिक चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल सीबीआयने न्यायालयासमोर मांडल्याचे अद्याप ऐकिवात नाही. या धाडींचा वापर राजकीय नेत्यांना बदनाम करण्यासाठीच होत आहे.

  • जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

 आज सुपात असलेलेही उद्या जात्यात जातीलः आज काही जण जात्यात आहेत तर काही सुपात आहेत. तेही जात्यात जायचे आहेत. परमेश्वर सर्वांचाच हिशेब पूर्ण करतो. या जन्मी केलेले याच जन्मी भोगायचे आहे. सचिन वाझे यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावरही आरोप केले आहेत. त्यांचीही सीबीआय चौकशी झाल पाहिजे.

  • चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा