सीसीटीव्ही फूटेज, फिंगरप्रिंट, लोकेशनः सचिन वाझेंच्या विरोधात एनआयएचे ‘तांत्रिक पुरावे’

0
427
संग्रहित छायाचित्र.

 मुंबईः उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराशेजारी स्फोटकांसह आढळलेल्या कारप्रकरणी अटक करण्यात आलेले सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे हे २५ फेब्रुवारी रोजी मनसुख हिरेन यांच्यासोबत असल्याचे ‘महत्वाचे’ सीसीटीव्ही फूटेज छत्रपती शिवाजी महाराज टर्निमनन्स रेल्वे स्टेशनहून हस्तगत केल्याचा दावा राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) केला आहे. मनसुख हिरेन हे अंबानींच्या घराशेजारी आढळलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक होते आणि याच दिवशी ही स्कॉर्पिओ अंबानींच्या घराशेजारी स्फोटकासह आढळून आली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबानींच्या घराशेजारी २५ फेब्रुवारी रोजी स्फोटके असलेली कार उभी करण्यात आली होती त्या दिवसांपासून ते ५ मार्च रोजी मुंब्रा खाडीमध्ये मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळला त्या दिवसापर्यंतचे वाझे यांचे कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फूटेज, मोबाइल फॉरेन्सिकचा निकाल, फिंगरप्रिंट आणि वाझे यांचे लोकेशन हे सगळे ‘तांत्रिक पुरावे’ या प्रकरणात वाझे यांचा सहभाग सिद्ध करण्यासाठी एनआयएकडे असल्याचे सूत्रांनी सांगितले. वाझे यांना शनिवारी रात्री ११ तासांच्या चौकशीनंतर एनआयएने अटक केली. एनआयएने गोळा केलेले ‘तांत्रिक पुरावे’ सचिन वाझेंना दाखवले, असेही सूत्रांनी सांगितले. वाझेंना विशेष न्यायालयाने २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.

 वाझे यांच्याविरुद्ध एनआयएने गुन्हेगारी कटासाठी कलम १२०(ब), निष्काळजीपणे स्फोटक पदार्थ हाताळण्यासाठी कलम २८६, बनावटीसाठी कलम ४६५, बनावट शिक्का तयार करणे किंवा बाळगण्यासाठी कलम ४७३, गुन्हेगारी स्वरूपाची धमकी देण्यासाठी कलम ५०२(२) आणि स्फोटक पदार्थ कायदा १९०८ च्या कलम ४(ए)(बी)(आय) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 सुरूवातीला ते (वाझे) बोलण्यासाठी खूपच अनिच्छूक होते आणि त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. परंतु जेव्हा त्यांना तांत्रिक पुरावे दाखवले, ज्यात त्यांचे अनेक ठिकाणच्या लोकेशनचा समावेश होता, त्याबाबत ते काहीच स्पष्टीकरण देऊ शकले नाही. सीटीटीव्ही फूटेज आणि फॉरेन्सिक अहवाल दाखवल्यानंतर वाझे यांनी मौन सोडले आणि या कटाचा आपण भाग असल्याचे कबुल केले, असे सूत्रांनी सांगितले. द प्रिंटने हे वृत्त दिले आहे.

मनसुख हिरेन यांना २५ फेब्रुवारी किंवा ५ मार्च रोजी भेटल्याचे वाझे सातत्याने नाकारत होते. परंतु जेव्हा त्यांना सीएसटीएम स्टेशनचे ‘महत्वाचे’ सीसीटीव्ही फूटेज दाखवले, तेव्हा त्यांच्याकडे कोणतेच स्पष्टीकरण नव्हते. अंबानींच्या घराशेजारी आढळलेली स्कॉर्पिओ कार आपण कधीच वापरलेली नाही, असा दावा वाझे करत होते, मात्र त्या स्कॉर्पिओ कारसह महत्वाच्या ठिकाणी वाझे यांच्या फिंगरप्रिंट आढळल्या, असेही सूत्रांनी सांगितले.

येत्या काही दिवसांत मुंबई पोलिसांतील मोठी नावे पुढे येण्याची शक्यता आहे. वाझे यांच्या टीममधील पोलिस निरीक्षक दर्जाच्या एका अधिकाऱ्याचे नावही पुढे आले असून त्याला अटक केली जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. हा एक मोठा कट आहे, त्यात वाझेंव्यतिरिक्तही आणखी लोकांचा समावेश आहे. मुंबई पोलिसांतील आणखी काही नावे पुढे येतील. आम्ही त्यावर काम करत आहोत, असे एनआयएच्या सूत्रांनी द प्रिंटला सांगितले.

अन्य एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार वाझे यांच्या टीममधील एका निरीक्षकानेच तपास भरकटवण्यासाठी स्कॉर्पिओवर बनावट नंबर प्लेट लावली. हा निरीक्षक या सगळ्या कटाचा भाग होता. त्यानेच स्कॉर्पिओची बनावट नंबर प्लेट बनवून घेतली. स्कॉर्पिओच्या चेसिस नंबरशीही छेडछाड करण्यात आली होती, असेही सूत्रांनी सांगितले.

एनआयएकडे असलेल्या फूटेजनुसार  पहाटे २ वाजून १८ मिनिटांनी ही स्कॉर्पिओ कार्मिकेल रोडवर पोहोचली. तिच्या मागे पांढऱ्या रंगाची इनोव्हा होती.स्कॉर्पिओचा चालक बाहेर पडला आणि इनोव्हामध्ये बसला. ही इनोव्हा मुलुंड टोल नाक्यावरून पहाटे ३ वाजून ५ मिनिटांनी जातानाचे फूटेज मुंबई पोलिसांना मिळाले आहे. ही इनोव्हा कार एनआयएने ताब्यात घेतली असून ती मुंबई पोलिसांचीच आहे. वाझे यांच्या टीमला ही इनोव्हा देण्यात आली होती. वाझे हे बहुतेक वेळ स्वतःचेच वाहन वापरत. ही इनोव्हा कार्यालयीन कामकाजासाठी वापरली जात होती, असे सूत्रांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा