डिजिटल न्यूज मीडियाला पंधरा दिवसात द्यावी लागणार नियमांच्या अनुपालनाची माहिती

0
114
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः सोशल मीडिया प्लॅटफार्म्सना नवीन नियमांची अंमलबजावणी करून अनुपालन अहवाल देण्याचे निर्देश दिल्यानंतर आता डिजिटल न्यूज मीडिया आणि ओटीटी प्लॅटफार्मने नवीन डिजिटल नियमांच्या अनुपालनाची माहिती १५ दिवसांत द्यावी, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. केंद्र सरकारच्या नव्या नियमांनुसार डिजिटल दुनियेतील न्यूज मीडिया कंपन्यांना आचार संहिता लागू करावी लागेल आणि त्रिस्तरीय तक्रार निवारण व्यवस्था उभारावी लागणार आहे.

या त्रिस्तरीय तक्रार निवारण व्यवस्थेत अनुपालन अधिकारी म्हणजेच कम्प्लायन्स अधिकाऱ्याची नियुक्ती, तक्रारींचे निवारण, आक्षेपार्ह सामग्रीची (कन्टेन्ट) देखरेख, अनुपालन अहवाल आणि आक्षेपार्ह सामग्री हटवणे या बाबींचा समावेश आहे.

विशेष म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना नवीन नियमांनुसार अनुपालनाची माहिती मागणारी नोटीस इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने बजावल्याच्या एक दिवसानंतर डिजिटल न्यूज मीडियासाठी केंद्र सरकारने हे निर्देश जारी केले आहेत.

काय आहेत नवीन नियम?:

नव्या नियमांन्वये केंद्र सरकारने डिजिटल न्यूजशी संबंधित कंपन्यांची नावे, संचालकांची नावे, पत्ते, फोन नंबर, तक्रार निवारण अधिकाऱ्यांची माहिती केंद्र सरकारला द्यावी लागेल.

आतापर्यंत केवळ ६० डिजिटल न्यूज प्लॅटफार्मनी नव्या नियमांनुसार स्वयंनियमन यंत्रणा ( सेल्फ रेग्युलेशन व्यवस्था) तयार करणे सुरू केल्याचे सांगितले आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. काही प्रकाशकांनी नवीन नियमांनुसार नोंदणीची व्यवस्था करावी, अशी लेखी मागणी मंत्रालयाकडे केली आहे.

डिजिटल न्यूज मीडियाच्या तीन श्रेणीः

  • केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने डिजिटल न्यूज मीडिया प्लॅटफार्मची तीन श्रेणींमध्ये विभागणी केली आहे. पहिल्या श्रेणीत अशा परंपरागत प्रकाशकांचा समावेश आहे, जे आपले वृत्तपत्र किंवा टीव्ही चॅनेलशिवाय ऑनलाइन बातम्या देतात, त्यांचा समावेश आहे.
  • दुसऱ्या श्रेणीमध्ये असे डिजिटल न्यूज प्रकाशक आहेत, जे केवळ ऑनलाइन न्यूज पोर्टल चालवतात.
  • तिसऱ्या श्रेणीमध्ये ओव्हर द टॉप म्हणजेच ओटीटी प्लॅटफार्मचा समावेश करण्यात आला आहे. डिजिटल माध्यमातून मनोरंजन किंवा अन्य माहिती देणारे ओटीटी प्लॅटफार्म यात समाविष्ट आहेत.

सरकारला नेमके काय हवे?:

  • पहिल्या श्रेणीतील प्रकाशकांकडून डोमेन नेम, यूआरएल, भाषा, ऍप, सोशल मीडिया अकाऊंट यासारखी मूलभूत माहिती मागवण्यात आली आहे. या माहितीबरोबरच या प्रकाशकांना टीव्ही चॅनेलची परवानगी किंवा वृत्तपत्राचा आरएनआय नोंदणी क्रमांक, संपर्काची माहिती आणि तक्रार निवारण व्यवस्थेचा तपशील आदी माहिती द्यावी लागेल.
  • दुसऱ्या श्रेणीतील डिजिटल न्यूज मीडियाकडूनही अशाच प्रकारची माहिती मागवण्यात आली आहे. मात्र यात कंपनीचा आयडेंटिफिकेशन नंबर आणि संचालक मंडळाची माहितीही मागवण्यात आली आहे. मात्र ही माहिती देणे त्यांच्यासाठी ऐच्छिक ठेवण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा