डीएपी खतांवरील सबसिडीत १४० टक्के वाढ, शेतकऱ्यांना खताची गोणी मिळणार १२०० रुपयांत!

0
390
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः डीएपी खतावरील सबसिडी म्हणजे अनुदानात तब्बल १४० टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना २४०० रुपयांत मिळणारी डीएपी खताची गोणी १२०० रुपयांतच मिळणार आहे. यामुळे केंद्र सरकारवर १४,७७५ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. यापूर्वी डीएपी खताच्या प्रत्येक गोणीवर ५०० रुपये अनुदान दिले जात होते.

खतांच्या किंमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी खत व रसायन मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता खतांच्या किंमती तातडीने कमी करण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आंतरराष्ट्रीयस्तरावर फॉस्फोरिक ऍसिड, अमोनियाच्या किंमती वाढल्यामुळे देशात खताच्या वाढलेल्या किंमतीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्या तरी शेतकऱ्यांना जुन्याच दराने खते मिळाली पाहिजे, असे मोदी या बैठकीत म्हणाले. त्यानंतर डीएपी खतावर दिली जाणारी प्रतिगोणी ५०० रुपये सबसिडी १४० टक्क्यांनी वाढवून १२०० रुपये करण्यात निर्णय घेण्यात आला.

डीएपी खताच्या सबसिडीमध्ये करण्यात आलेल्या १४० टक्के वाढीमुळे शेतकऱ्यांना आता खताची गोणी १२०० रुपयांतच मिळणार आहे. किंमत वाढीचा अतिरिक्त भार केंद्र सरकार उचलणार आहे. मागील वर्षी डीएपी खताच्या एका गोणीची किंमत वास्तविक किंमत १७०० रुपये होती. त्यावर केंद्र सरकार ५०० रुपये सबसिडी देत होते. त्यामुळे खत उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांना खताची एक गोणी १२०० रुपयांत विकत होत्या.

आंतरराष्ट्रीय बाजारात फॉस्फोरिक ऍसिड आणि अमोनियाच्या किंमतीत ६० ते ७० टक्के वाढ झाली. सरकारच्या म्हणण्यानुसार डीएपी खताच्या गोणीची किंमत २४०० रुपये आहे. त्यातून केंद्र सरकारची ५०० रुपये सबसिडी वजा करून खत उत्पादक कंपन्या खताची एक गोणी १९०० रुपयांना विकत होत्या.

शेतकऱ्यांवर २० हजार कोटींचा बोजा टाकल्याचा काँग्रेसचा आरोपः मोदी सरकारने खताच्या किंमती वाढवून शेतकऱ्यांवर २० हजार कोटी रुपयांचा बोजा टाकल्याचा आरोप आज बुधवारीच काँग्रेसने केला होता. डीएपी खताच्या प्रत्येक गोणीच्या किंमतीत ७०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. खताच्या किंमतीतील या वाढीमुळे खत उत्पादक कंपन्यांना १३ हजार कोटींचा नफा होणार आहे, असेही काँग्रेसने म्हटले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा