बारावीच्या परीक्षांबाबत आज केंद्र स्तरावर बैठक, राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांचीही उपस्थिती

0
37
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक वाढल्यामुळे लांबणीवर टाकण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षांबाबत रविवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांचे शिक्षणमंत्री आणि शिक्षण सचिवांचीही उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली.

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने बारावीच्या परीक्षांबाबत विद्यार्थी आणि पालकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून सूचना आणि मते मागवली होती. या व्हर्च्युअल बैठकीत बारावीच्या परीक्षांबरोबरच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या मुद्यावर चर्चा होणार आहे. रविवारी सकाळी साडेआकरा वाजता ही बैठक होणार आहे.

शालेय शिक्षण विभाग आणि सीबीएसई यांनी परीक्षा घेण्याचे पर्याय निवडावेत, असे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राज्ये व केंद्र शासित प्रदेशांच्या शिक्षण मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षांचा परिणाम इतर राज्ये मंडळांवर आणि प्रवेश परीक्षांवरही होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनिश्चितता आणि संभ्रमाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारच्या बैठकीत काय निर्णय होतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा