राज्यांतर्गत रेल्वेही सुरू होणार, उद्यापासून आरक्षित तिकिटे असलेल्यांनाच प्रवासाची परवानगी!

0
517
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः राज्य सरकारने जारी केलेल्या मिशन बिगिन अगेनच्या चौथ्या टप्प्यासाठी राज्यांतर्गत प्रवासासाठीची ई-पासची अट रद्द केल्यानंतर रेल्वेनेही राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी दिली असून मध्य रेल्वेचे बुकिंग उद्या २ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मध्य रेल्वेने याबाबतचे एक परिपत्रक जारी करून राज्यांतर्गत रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

राज्य सरकारने जारी केलेल्या अनलॉक- ४ अंतर्गत ई-पासची अट रद्द करून विनाअट एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासाची मुभा दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने महाराष्ट्रात आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २ सप्टेंबरपासून प्रवाश्यांना राज्यांतर्गत प्रवासासाठी रेल्वे स्टेशनवर तिकिटांचे आरक्षण करता येईल, असे मध्य रेल्वेचे मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक (सीपीटीएम) डी. वाय. नाईक यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर आणि परिवहन सचिव आशिष कुमार सिंग यांना आजच लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

मध्य रेल्वेने महाराष्ट्रांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतुकीसाठी तिकिटांचे आरक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी या प्रवासी वाहतुकीसाठी नेमकी काय नियमावली असेल, हे स्पष्ट केलेले नाही.  ज्यांच्याकडे आरक्षित तिकिटे असतील त्यांनाच २ सप्टेंबरपासून रेल्वे प्रवासाची परवानगी असेल.

जेईई-नीटच्या विद्यार्थ्यांना लोकलने प्रवासाची परवानगीः दरम्यान, जेईई आणी नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मुंबईत विशेष उपनगरी रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आल्याची घोषणा पश्चिम रेल्वेने केली आहे. जेईई/नीटचे परीक्षार्थी आणि त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तीला परीक्षेचे हॉल तिकिट दाखवून उपनगरी रेल्वेचे तिकिट घेता येईल, असेही पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा