रब्बीच्या हंगामात खरिपातील पिकांच्या नुकसानीची केंद्राच्या पथकाकडून पाहणी

0
139

औरंगाबाद: अतिवृष्टीने राज्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहे. या पथकाने आज औरंगाबाद तालुक्यातील निपाणी, पिंपळगाव पांढरी, पैठण तालुक्यातील गाजीपूर, निलजगाव, शेकटा आणि गंगापूर तालुक्यातील मुरमी, ढोरेगाव, जाखमाथा, वरखेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील बांधावर जाऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी नुकसानीची तब्बल दोन महिने उशिराने ही पाहणी होत असून बहुतांश शेतकऱ्यांनी आता हरभरा आणि ज्वारीसारखी रब्बीची पिके पेरली आहेत.

ऑक्टोबर महिन्याच्या प्रारंभीच राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला बसला होता. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले खरिपाचे पिक गेले. त्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी उसनवारी करुन भुसपाट झालेले पिक काढून टाकून शेतजमिनीची साफसफाई केली आणि ज्वारी, हरभऱ्यासारखी रब्बीची पिके पेरली. अतिवृष्टी होऊन तब्बल दोन महिने उलटल्यानंतर केंद्राचे पथक आता पाहणी करण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहे. त्यामुळे या पथकाला महाराष्ट्रात अतिवृष्टीने नेमके किती नुकसान झाले याचा कसा काय अंदाज येणार? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

केंद्रीय पथक प्रमुख तथा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव रमेश कुमार गंता, केंद्रीय वित्त मंत्रालयाचे सल्लागार आर.बी.कौल यांनी आज औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यात पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. अतिपावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत दुःख व्यक्त करत शासनाची लवकरच मदत मिळेल, असे आश्वासन शेतकऱ्यांना केंद्रीय पथकाच्या समितीने दिले. पाहणी दरम्यान विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.तुकाराम मोटे, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर आदींसह  वरिष्ठ अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.

मुरमी येथील संजय म्हस्के यांच्या शेतातील ज्वारी, मकाच्या नुकसानीची माहिती विभागीय आयुक्त श्री.केंद्रेकर यांनी सदस्यांना दिली. ढोरेगाव येथील अहेमद जाफर  शेख यांनी सव्वा एकर मका पिकाचे नुकसान झाले असल्याचे सांगितले. तसेच धर्म बेडवाल यांनीही दोन एकरातील कापसाचे अति पावसाने नुकसान झाले आहे. जाखमाथा येथे सदानंद थोरात यांच्या दोन एकर शेतातील अद्रक खराब झाली असल्याने, बाळासाहेब जाधव यांच्या शेतातील बाजरी, वरखेड येथे विकास उबाळे यांच्या ४ एकर क्षेत्रातील मका आणि दोन एकरातील कापूस पिकांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

गंता आणि कौल यांनी ‘तुमच्या पिकांची पाहणी केली आहे, पंचनामा झाला आहे,  झालेल्या नुकसानीची पाहणीही केली आहे, शासनाच्या नियमाप्रमाणे मदतही मिळेल’ असे शेतकऱ्यांना सांगितले. त्याचबरोबर वरखेड येथील पाणंद रस्त्याची पाहणी आणि गौतम कांबळे यांच्या शेतातील कांदा लागवाडीचीही पाहणी त्यांनी केली.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी पथकाच्या पाहणीबाबत सांगताना पथकाने जिल्हातील विविध ठिकाणी भेट देऊन कापूस, मका, सोयाबीन, बाजरी, अद्रक आदी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आहे, जास्त पावसामुळे शेतकऱ्यांना कापणी करता आली नाही, त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे, या नुकसानीची योग्य तपासणी पथकातील समिती सदस्यांनी केली आहे, त्यामुळे जिल्ह्याला योग्य न्याय मिळेल, अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी व्यक्त केली. 

औरंगाबाद, पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांशीही संवादः औरंगाबाद तालुक्यातील निपाणी येथे सुनील काला, नंदू भालेकर, संदीप दुदल, दिलीप भालेकर, सखाराम पुंगळे, लहू भालेकर, पिंपळगाव पांढरी येथे विपिन कासलीवाल, विठ्ठल बहुरे, गाजीपूर येथे रामभाऊ राहतवाडे, निलजगाव येथे मच्छिंद्र मोगल आणि शेकटा येथे हरिश्चंद्र भवर यांच्याशी देखील केंद्रीय पथक प्रमुख गंता आणि कौल यांनी संवाद साधत नुकसानीची पीक पाहणी केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा