केंद्र- राज्य संघर्षाची ठिणगीः कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचे काम थांबवण्यासाठी बजावली नोटीस

0
108
छायाचित्रः twitter/@AUThackeray

मुंबईः मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला(एमएमआरडीए) कांजूरमार्ग येथील सरकारी जमिनीवरील मेट्रो कारशेडचे बांधकाम करण्यापासून तत्काळ रोखा, ते केंद्र सरकारच्या हिताच्या विरोधात आहे, अशी नोटीस केंद्र सरकारच्या  उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीपीआयआयटी) राज्याच्या मुख्य सचिवांना बजावली असून त्यामुळे केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार संघर्षाची नव्याने ठिणगी पडली आहे.

 कांजूरमार्गमधील ज्या १०२ एकर सरकारी जमिनीवर मेट्रो ३ चे कारशेड उभारण्यात येत आहे, ती जागा मीठागराची असून मीठ संचालनालय गुजरात केडरचे सनदी अधिकारी गुरुप्रसाद मोहपात्रा प्रमुख असलेल्या डीपीआयआयटीला रिपोर्ट करते. जिल्हाधिकारी आणि एमएमआरडीएच्या अनुचित आणि एकतर्फी कारवाईमुळे केंद्र सरकारचे मोठे नुकसान झाले असून केंद्र सरकारच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ही जमीन एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत, असे मोहपात्रा यांच्या स्वाक्षरीने राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

मोहपात्रा यांच्या या पत्रामुळे मोदी सरकारविरुद्ध महाविकास आघाडी सरकार अशा संघर्षाची ठिणगी पडली असून गरज भासल्यास कोर्टात जाण्याची तयारीही महाराष्ट्र सरकार करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मेट्रो ३ च्या कारशेडसाठी कांजूरमार्गमधील सरकारी जमीन एमएमआरडीएला हस्तांतरित करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे आणि दस्तऐवजांची पडताळणी करण्यात आली. ही जागा महाराष्ट्र सरकारच्या मालकीची असल्याची खात्री करूनच ती एमएमआरडीएला हस्तांतरित करण्यात आली आहे.

आरेतील जंगलतोड करून मेट्रो ३ चा कारशेड प्रकल्प उभारण्यास शिवसेनेचा सुरुवातीपासूनच विरोध होता. आरेतील मेट्रो कारशेड प्रकल्प कांजूरमार्गला हलवण्याची घोषणा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  २०१५ मध्ये तांत्रिक समितीच्या अहवालातही मेट्रो कारशेड प्रकल्पासाठी कांजूरमार्गचीच शिफारस करण्यात आली होती, असे सांगितले होते.

आरेतील जंगलाचा विध्वंस वाचवण्यासाठी मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्या पर्यावरणवाद्यांनीही २०१५ च्या तांत्रिक समितीच्या अहवालाचा वारंवार दाखला देत आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गमधील रिकाम्या जागेवर हालवण्याची मागणी केली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा