दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावरील चक्रवाढ व्याज माफ, ५ नोव्हेंबरपर्यंत रक्कम होणार खात्यात जमा

0
92
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनंतर केंद्र सरकारने कर्जहप्ते स्थगिती काळातील दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावरील चक्रवाढ व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. माफ करण्यात आलेली व्याजाची रक्कम ५ नोव्हेंबरपर्यंत कर्जदारांच्या खात्यातही जमा होणार आहे.

 कोरोना महामारीच्या काळात रिझर्व्ह बँकेने कर्जाचे हप्ते भरण्यासाठी कर्जदारांना दोनवेळा मुदतवाढ देण्याचे निर्देश बँकांना दिले होते. दुसऱ्या मुदतवाढीचा कालावधी ३१ ऑगस्ट रोजी संपला. या मुदतवाढीच्या काळातील कर्ज हप्त्यांवरील व्याज माफ करावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

१४ ऑक्टोबर रोजी या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने व्याज माफीबाबत विस्तृत योजना सादर करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले होते. या याचिकेची पुढील सुनावणी आता २ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्या सुनावणीच्या आधीच केंद्र सरकारने शुक्रवारी रात्री उशिरा ही घोषणा केली. १ मार्च ते ३१ ऑगस्ट या कालावधीतील चक्रवाढ व्याज माफ होणार आहे. ज्या कर्जदारांनी कर्जहप्तावसुली स्थगितीची सुविधा घेतलेली नाही, अशाही कर्जदारांचे व्याज माफ होणार आहे. फक्त बुडित प्रकारातील कर्जावरील व्याज मात्र माफ केले जाणार नाही.

कर्जदारांचे चक्रवाढ व्याज माफीमुळे केंद्र सरकारला ६ हजार ५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भूर्दंड बसणार आहे. ही चक्रवाढ व्याज माफी गृहकर्ज, शिक्षण, वाहन कर्ज, एमएसएमई कर्ज इत्यादी कर्जाचा समावेश आहे. दिवाळीच्या तोंडावरच केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा