१ डिसेंबरपासून नवी कोरोना नियमावली; ‘पदवीधर, शिक्षक’च्या मतदानावर अनिश्चिततेचे सावट?

0
849
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः दिवाळीनंतर देशभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊ लागल्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाला अटकाव करण्यासाठी केंद्र सरकारने आज १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीसाठी नवीन नियमावली जारी केली असून राज्यांना कडक निर्बंध लावण्याची मोकळीक दिली आहे. ज्या दिवसापासून या नवीन नियमावलीची अंमलबजावणी होणार आहे, त्याच दिवशी म्हणजे १ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात विधान परिषदेच्या पाच पदवीधर व शिक्षक मतदारसंघात मतदान होणार आहे, त्यामुळे नव्या नियमावलीच्या पार्श्वभूमीवर या मतदानावर अनिश्चिततेचे सावट मानले जात आहे.

 केंद्र सरकारने आज जारी केलेल्या कोरोनासाठीच्या नवीन नियमावलीनुसार राज्यांनी अधिक खबरदारी घेतली पाहिजे. देखरेख, कंटेनमेंट आणि सावधिगिरी बाळगता कठोर राहिले पाहिजे, असे या नियमावलीत म्हटले असून राज्यांना त्यांच्या परिस्थितीनुसार निर्बंध लावण्याची मुभा देण्यात आली आहे. निर्बंधांची अंमलबजावणी आणि नियमांचे पालन करून घेण्याची जबाबदारी स्थानिक जिल्हा प्रशासन आणि पोलिसांवर टाकण्यात आली आहे. ज्या शहरांमध्ये आठवड्याला १० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत, अशा शहरांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करून एकाच वेळी कार्यालयात अधिक कर्मचारी असू नये, असेही या नियमावलीत म्हटले आहे. ही नवीन नियमावली १ डिसेंबरपासून लागू होणार असून याच दिवशी महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात मतदान होत आहे.

हेही वाचाः मराठा आरक्षणाशिवाय होणार आकरावीसह सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया, शासन आदेश जारी
हेही वाचाः उद्याच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

दरम्यान, महाराष्ट्रात आज ६ हजार १५९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून ही संख्या चिंता वाढवणारी आहे. विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघात निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी १ डिसेंबरला मतदान होत आहे. ज्या पाच मतदारसंघात ही निवडणूक होत आहे त्यापैकी पुणे, औरंगाबाद आणि नागपूर हे कोरोनाचे हॉटस्पॉट राहिले असून आजही या शहरात दररोज आढळून येणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या केंद्राच्या नवीन नियमावलीनुसार १० पेक्षा अधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी निर्बंध लावले जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

हेही वाचाः सरकारच्या स्थैर्याबाबत अजितदादांचे पहिल्यांदाच वक्तव्य, म्हणाले ‘त्यांना’ गाजर दाखवावेच लागते!

केंद्र सरकारने आज जारी केलेल्या नवीन नियमावलीनुसार औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग, देखरेख आणि सावधगिरीचे कडक निर्बंध लागू केले तर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील मतदान होणार कसे? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. या मतदानासाठी एका मतदान केंद्रावर सरासरी एक हजार मतदार असतील, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंगचे नियमाचे पालन होणेही कठीणच असल्यामुळे या मतदानावर अनिश्चिततेचे सावट आल्याचे मानले जात आहे. येत्या दोन दिवसांत केंद्राच्या नियमावलीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नवीन नियमावली जारी केली जाईल, तेव्हाच याबाबतची स्थिती अधिक स्पष्ट होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा