‘उमेद’ला नाऊमेद करणाऱ्या प्रवीण जैन यांची उचलबांगडी, विमला आर. यांच्याकडे पदभार

0
559
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेदच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना खासगी संस्थेकडे वर्ग करून त्यांचा रोष ओढवून घेतलेले मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण जैन यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली असून त्यांचा कार्यभार जलजीवन मिशनच्या संचालक श्रीमती विमला आर. यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

 उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण जैन यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पुनर्नियुक्ती थांबवण्याचे आदेश देणारे पत्र १० सप्टेंबर रोजी केले होते. त्यावरून उमेदमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला होता. याच मुद्यावरून उमेदच्या कर्मचाऱ्यांनी राज्यभर आंदोलने केली होती. खासगी कंपनीचे हित जोपासण्यासाठी प्रवीण जैन यांनी उमेदच्या हजारो कर्मचाऱ्यांच्या आयुष्याशी खेळ चालवल्याचा आरोपही या कर्मचाऱ्यांनी केला होता.

 दरम्यान,  राज्याच्या ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी रविवारी आयएस अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर चांगलाच गोंधळ घातला होता. महाराष्ट्रात आयएएस अधिकाऱ्यांचे दोन प्रमुख वाटसॲप ग्रुप आहेत. त्यात एका समूहावर राज्यातील सचिव दर्जाचे वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि दुसऱ्या ग्रुपवर जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले तरुण आयएएस अधिकारी आहेत.

यातील एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर अरविंद कुमार यांनी रविवारी रात्री बराच गोंधळ घातला. विशेष म्हणजे त्यांनी आपल्याच केडरच्या अत्यंत वरिष्ठ अशा सहकाऱ्यांवर बरीच मुक्ताफळे उधळली होती. त्यामुळे त्यांच्याकडील पदभार काढून घेऊन पाणीपुरवठा विभागाचे अपर सचिव संजय चहांदे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

 उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण जैन हे अरविंद कुमार यांचा उजवा हात म्हणून काम करत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे अरविंद कुमार यांच्याकडील पदभार काढून घेतल्यानंतर प्रवीण जैन यांच्याकडील उमेदचा कार्यभारही काढून घेण्यात आला आहे.

उमेदचे शिष्टमंडळ गवईंना भेटलेः दरम्यान, उमेदच्या कर्मचाऱ्यांनी रिपाइं नेते राजेंद्र गवई यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. खाजगीकरणाचा पुरस्कार करणाऱ्या केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल ठेऊन राज्य सरकार जर भांडवलदारांचे, ठेकेदारांचे हित जोपासण्यात धन्यता मानत असेल तर  रिपाइं त्यास तीव्र विरोध करेल. ८ ते १० वर्षापासून महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी अखंड सेवा देणाऱ्या उमेद कर्मचाऱ्यांच्या पुनर्नियुक्ती विरोधात काढलेले अन्यायकारक परिपत्रक तत्काळ रद्द न केल्यास रिपाइं राज्यभर रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलनास सज्ज असल्याची ग्वाही राजेंद्र यांनी उमेदच्या शिष्टमंडळास चर्चेदरम्यान दिली.

राज्यातील उमेद कर्मचाऱ्यांनी नाउमेद होऊ नये. लवकरच  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि अब्दुल सत्तार यांच्याशी चर्चा करतो. प्रश्न न सुटल्यास लोकशाही मार्गाने लढा उभारु. आम्ही सरकारसोबत आहोत. सरकारजमा नाही. तुमच्या न्याय हक्कासाठी वेळप्रसंगी रिपाइं रक्त सांडेल, मात्र सरकारला हजारो कर्मचाऱ्यांना उपाशी मारू देणार नाही. उमेदच्या राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांची एकजूट करून लढा उभारू, अशी ग्वाही देत गवई यांनी नेतृत्वाची जबाबदारी स्विकारली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा