तारीख ठरलीः २१ ऑगस्टला होणार इयत्ता ११ वी प्रवेशासाठीची सीईटी!

0
310
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीची तारीख आज जाहीर करण्यात आली आहे. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत राज्यभरात ही सीईटी घेण्यात येणार आहे. ११ वीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी उद्या, २० जुलैला सकाळी ११.३० वाजेपासून २६ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येतील.

इयत्ता दहावीचा निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला होता. हा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटीच्या तारखेची प्रतीक्षा होती. या सीईटीच्या आधारावरच विद्यार्थ्यांना हव्या असलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. सीईटीमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना हा प्रवेश दिला जाईल.

इयत्ता ११ वीच्या सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉलतिकिटही ऑनलाइनच मिळणार आहे. ही सीईटी १०० गुणांची असणार आहे. एसएससी बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित या सीईटीमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. ओएमआर पद्धतीने बहुपर्यायी प्रश्नपत्रिका असेल. विशेष म्हणजे ही सीईटी ऑफलाइनच घेतली जाणार आहे.

कसे असेल या सीईटीचे स्वरूपः

  • सीईटी राज्य मंडळाच्या इयत्ता १० वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. सदर १०० गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील तसेच ओएमआर पद्धतीने २ तासांची परीक्षा घेण्यात येईल.यात इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न असतील. परीक्षा ऑफलाइन घेण्यात येईल.
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळांशी संलग्न असलेल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व मंडळांच्या म्हणजेच राज्य मंडळ, सीबीएसई, सीआयएससीई व सर्व आंतरराष्ट्रीय मंडळे यांच्या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आयोजित करण्यात येईल.
  • शिक्षण आयुक्तांच्या देखरेखीखाली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ही परीक्षा आयोजित करण्यात येईल. परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ/परीक्षा परिषदेमार्फत घोषित करण्यात येईल.
  • सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता १० वीच्या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेसाठी परीक्षा शुल्क अदा केलेले असल्याने त्यांना सीईटीसाठी शुल्क भरावे लागणार नाही. तथापि अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना विहित करण्यात आलेले शुल्क अदा करावे लागेल.
  • इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया राबवताना विद्यार्थ्यांना सीईटीमधील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा