लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरेंना पाडणारे अब्दुल सत्तार शिवसेनेला प्रिय कसे?

0
368

उद्धव भा. काकडे

औरंगाबाद : भाजपने लाथाडल्यानंतर काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी आता शिवसेनेत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी थेट मुंबईत मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले. यामुळे औरंगाबादच्या शिवसैनिकांनाही आश्‍चर्याचा धक्का बसला. लोकसभा निवडणुकीत शिवसेना नेते चंदक्रांत खैरे यांना पाडण्यात खारीचा वाटा असलेले  अब्दुल सत्तार यांना शिवसेनेने स्वीकारलेच कसे? भाजपला नको असलेले शिवसेनेला प्रिय कसे झाले? असा प्रश्‍न जनसामान्यांतून उपस्थित केला जात आहे. 2014 पासून केंद्र आणि राज्यात सत्तेत आल्यानंतर राष्ट्रीय पक्ष भाजपने ‘पक्ष फोडा आणि सत्ता गाजवा’ असे मतलबी धोरण स्वीकारले आहे. कोणत्याही पक्षातील नाराजांना सत्तेचे गाजर दाखवून त्यांना स्वतःकडे खेचण्याच्या भाजपच्या रणनितीपुढे शिवसेनेलाही आत्मचिंतन करण्यास भाग पाडले आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात कट्टर हिंदुत्ववादी असलेली शिवसेना आज बदलत्या राजकारणावर पाऊल टाकताना दिसत आहे. शिवसेनेला सत्तारांसारख्या नेत्याची गरज होती, असे सांगत काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांचे पक्षात हसतमुखाने स्वागत करण्यात आल्यामुळे हे स्पष्ट झाले आहे. एकीकडे युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी औरंगाबाद दौऱ्यात राष्ट्रवादीचे विनोद पाटील घरी जाऊन शिवसेनेत येण्याचे आमंत्रण दिले. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खैरेंच्या पराभवास कारणीभूत असलेल्या अब्दुल सत्तारांना शिवबंधन बांधून शिवसेनेत स्वीकारले. एकेकाळी काँग्रेसमध्ये असताना आमदार अब्दुल सत्तार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर विविध आरोप करायचे.  सत्तार यांना सिल्लोडचा तो हिरवा साप म्हणत खैरे प्रत्युत्तर द्यायचे. लोकसभा निवडणुकीत खैरेंचे कट्टर विरोधक तथा शिवसेनेचे बंडखोर आमदार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा देत सत्तार यांनी शिवसेना-भाजप युतीची बरीच मते फोडली. परिणामी, थोड्या फरकानेच खैरेंना पराभव पत्करावा लागला.

सिल्लोडमधील इच्छुकांची निराशा

  पराभवाचे शल्य काळजात ताजे असतानाच सत्तारांना शिवसेनेने स्वीकारल्यामुळे शिवसैनिकांतून नाराजी व्यक्‍त केली जात आहे. याच सत्तारांना आता सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारीही दिली जाणार आहे. त्यामुळे इतके दिवस आशेवरत बसलेल्या निष्ठावंतांच्या स्वप्नांवर यामुळे पाणी फेरले गेले आहे. भाजप मात्र सत्तारांचा गेम करण्याच्या तयारीत आहे.

 भाजपची शिवसेनेवर नाराजी

 भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आ. सत्तार यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र, औरंगाबादच्या स्थानिक नेत्यांनी त्यास तीव्र विरोध केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस यांनी मनात असतानाही सत्तारांना प्रवेश नाकारला. मात्र, शिवसेनेने सत्तारांना प्रवेश दिल्याने आता भाजपमधून शिवसेनेविषयी नाराजी व्यक्‍त केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा