औरंगाबादः फर्दापुरात १० एकर जमिनीवर उभारणार शिवाजी महाराजांचे भव्यदिव्य स्मारक!

0
154
संग्रहित छायाचित्र.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जगासमोर यावा यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगांव तालुक्यातील फर्दापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा आपला मानस आहे, अशी माहिती महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. स्मारक परिसरात महाराजांचा भव्य अश्वरुढ पुतळा उभारला जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याबाबत चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांसरख्या वीर लढवय्याच्या कार्याची प्रेरणा युवा पिढीला मिळत रहावी यासाठी हे स्मारक महत्वपूर्ण ठरणार आहे. महाराजांचे युद्धकौशल्य, सुराज्य, अष्टप्रधान मंत्रिमंडळ, त्यांची हस्तलिखिते, शस्त्रास्त्रे असे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जीवंत करणारे साहित्य एकाच ठिकाणी पर्यटकांना बघायला मिळणार आहे. हे स्मारक सर्व दृष्टीने परिपूर्ण असावे यासाठी इतिहास संशोधक, लेखक, वास्तुकला, शिल्पकार या सगळ्या तज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे, असे सत्तार म्हणाले.

या बैठकीला माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, खासदार डॉ. अमोल कोल्हे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाचे कार्यकारी सदस्य सचिन मुळे, सुप्रसिद्ध लेखक प्रा. नामदेवराव जाधव, शिरिष देशपांडे, इतिहास अभ्यासक प्रा.नितीन बानगुडे पाटील, दिग्दर्शक कार्तिक केंडे, शिल्पकार प्रमोद कांबळी, कॅलिग्राफर अच्युत पालव, आर. आर. पाटील फाऊंडेशनचे विनोद पाटील उपस्थित होते.

बैठकीत उपस्थितीतांनी अनेक महत्वपूर्ण सूचना यावेळी केल्या. या स्मारकाच्या ठिकाणी दृकश्राव्य माध्यमाचा जास्तीत जास्त वापर व्हावा, असे मत माजी राज्यमंत्री खोतकर यांनी व्यक्त केले. शिवाजी महाराजांवरील साहित्याची अभ्यासिका असावी असे मत लेखक जाधव यांनी मांडले.  मूर्तीकार कांबळी यांनी दगडी मूर्ती असावी असे सूचविले. तर प्रा. बानगुडे पाटील यांनी शिवाजी महाराजांच्या अचर्चित कार्यावरील शिल्पे उभारण्यावर भर द्यावा असे सांगितले.

पहिल्या टप्प्यात लागणार २१ कोटींचा खर्चः टप्प्याटप्प्यात तयार होणारे हे स्मारक दहा एकरच्या परिसरात उभारले जाणार असून पहिल्या टप्प्यात रुपये २१ कोटी एवढा निधी लागणार आहे. या प्रकल्पाच्या भविष्यातील देखभाल दुरुस्तीसाठी खासगी संस्थांकडून सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत मिळणारा निधी वापरण्यात येईल. त्याच प्रमाणे स्थानिक आमदार आणि खासदार यांच्या निधीतील १० टक्के निधी या कामासाठी राखून ठेवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचे सत्तार यांनी यावेळी सांगितले.

अजिंठा लेणींच्या कुशीत असे असेल स्मारकः

  • जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांच्या सभोवतालच्या फर्दापूर येथील परिसरात महाराष्ट्राचे अराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे दहा एकर जमिनीवर जागतिक दर्जाचे भव्य स्मारक.
  • छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण, मावळ्यांची माहिती, किल्ल्यांची माहिती, अष्टप्रधान मंडळ यांची माहिती देणारे दालन.
  • या जागतिक दर्जाच्या स्मारक परिसरात महाराजांचा अश्वरुढ भव्य पुतळा.
  • अद्यावत ग्रंथालय, प्रशासनिक संदर्भाचे ग्रंथ, महाराजांची हस्त लिखीते, युद्धात वापरलेली शस्त्रास्त्रे यांचे प्रदर्शन.
  • शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत चित्रपट दाखविण्यासाठी मुक्त आकाश रंगमंच (अ‍ॅम्फीथिएटर),३डी ऑडीयो व्हिज्युअल, लेझर शो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा