मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मटन-चिकन बिर्याणी ११ रुपयांत, चहा मात्र १४ रुपयांत!

0
236
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः स्वस्तात मस्त मटन किंवा चिकन बिर्याणी खायची असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकारी निवासस्थान ‘वर्षा’ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सरकारी निवासस्थान ‘देवगिरी’च्या कॅन्टीनमध्ये जावे लागेल. येथील कॅन्टीनमध्ये तुम्हाला अवघ्या ११ रुपयांत मटन किंवा चिकन बिर्याणी मिळेल. येथील कॅन्टीनमध्ये बिर्याणीपेक्षा मात्र चहा महाग आहे. त्यासाठी तुम्हाला १४ रुपये मोजावे लागतील.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट द्यायला अनेक अतिथी येत असातात. त्यांच्या खानपानाची सोय व्हावी म्हणून वर्षा आणि देवगिरी या दोन्ही सरकारी निवासस्थानी कॅन्टीन आहे. या कॅन्टीनमधील खाद्यपदार्थ तेथे येणाऱ्या अतिथींनी अगदीच माफक दरात मिळणार आहेत. दर पाहिले तर ते संसदेच्या कॅन्टीनपेक्षाही कितीतरी पटीने स्वस्त आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘वर्षा’ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ या सरकारी निवासस्थानी सामान्य प्रशासन विभागाने दोन दिवसांपूर्वी खानपान सेवा पुरवठादार कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. मुंबईच्या सेंट्रल केटरर्सला जानेवारी २०२३ पर्यंत या दोन्ही निवास्थानाच्या कॅन्टीमध्ये खानपान सेवा पुरवण्याचे काम देण्यात आले आहे.

कंत्राटदाराने दिलेल्या दरसूचीनुसार वर्षा आणि देवगिरीच्या कॅन्टीनमध्ये मटन किंवा चिकन बिर्याणी अवघ्या ११ रुपयांत मिळणार आहे. चहा प्यायची झाली तर मात्र त्यासाठी १४ रुपये मोजावे लागणार आहेत. या दोन्ही कॅन्टीनमध्ये मसाला डोसा ११ रुपयात, दही मिसळ १० रुपयांत, इडली २० रुपयांत, बटाटे वडा, वडा सांबर, शिरा, उपमा, पोहे प्रत्येकी २० रुपयांत, साबुदाणा खिचडी १० रुपयांत, चिकन सूप ११ रुपयांत आणि पनीर मटार, मेथी बेसन आणि पालक १० रुपयांतच मिळणार आहे. या दोन्ही कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांचे हे भाव पाहिले तर राज्यात महागाई नव्हे तर स्वस्ताई आहे, असेच वाटल्याशिवाय रहात नाही.

आता ही स्वस्ताई कशी, असा प्रश्न पडला असेल तर त्याचेही उत्तर आहे. या दोन्ही ठिकाणी कंत्राटदाराला वापरण्यासाठी देण्यात येणाऱ्या खोल्यांचे भाडे, वीज आणि पाणी बिल सार्वजनिक बांधकाम विभाग भरणार आहे. त्यामुळेच कदाचित कंत्राटदाराने एवढ्या स्वस्तात हे खाद्यपदार्थ देण्याचे ठरवलेले असावे.

गेल्या काही महिन्यांपासून महागाई गगनाला भिडली आहे. जवळपास सर्वच खाद्यपदार्थांचे भाव वाढले आहेत. गोडेतेलही महागले आहे. त्यामुळे हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे भावही महागले आहेत. परंतु वर्षा आणि देवगिरी या दोन्ही सरकारी निवासस्थानाच्या कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांचे दर मात्र हॉटेलपेक्षा निम्मे किंवा त्यापेक्षाही कमीच आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा