पोलिसांचा अ‌ॅक्सिस बँकेतील पगार एसबीआयतूनच होणार, फडणवीसांचा निर्णय ठाकरे बदलणार

0
168
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्यातील पोलिसांची सर्व वेतन खाती पुन्हा राष्ट्रीयकृत बँकेत वळती केली जाण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलिसांची वेतन खाती एसबीआय या राष्ट्रीयकृत बँकेतून खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेत वळती केली होती. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांचा हा निर्णय रद्द करून पुन्हा पोलिसांची वेतन खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळती करतील, अशी शक्यता आहे. राज्यमंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर हा मोठा निर्णय घेतला जाईल, असे सांगितले जाते.

 राज्यातील पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांची वेतन खाती राष्ट्रीयकृत बँकेतून खासगी क्षेत्रातील पाचपैकी एक मोठी बँक असलेल्या अॅक्सिस बँकेत वर्ग करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता. फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस अॅक्सिस बँकेत  पश्‍चिम भारताच्या व्हाइस प्रेसिडेंट आणि कॉर्पोरेट हेड या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळेच फडणवीसांनी पदाचा दुरुपयोग करून अॅक्सिस बँकेला मदत केली, असा आरोप 2017 मध्ये पोलिसांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतून अ‍ॅक्सिस बँकेत वर्ग केल्यावर झाला होता.

 राज्यातील पोलिस खात्यात दोन लाखांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या वेतनाचा वार्षिक खर्च 11 हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. पोलिसांच्या वेतनाची ही सर्व खाती आधी स्टेट बँक ऑफ इंडियामध्येच होती. मात्र फडणवीसांनी ती अॅक्सिस बँकेत वर्ग केली होती. महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यामुळे आता ही वेतन खाती पुन्हा एकदा राष्ट्रीयकृत बँकेकडे वर्ग होतील. राज्य सरकार पोलिसांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतून करण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार करत असल्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेचे मोठे नुकसान झाले होते तर अॅक्सिस बँकेला मोठा व्यवसाय मिळाला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा