शॉर्टसर्किटमुळे बंगल्याला भीषण आग, दहा वर्षीय चिमुकल्याचा गुदमरुन मृत्यू; औरंगाबादेत दुर्घटना

0
143

औरंगाबाद: शॉर्टसर्किटने एलईडी आणि सोलारच्या उपकरणांनी अचानक पेट घेतला. या भीषण आगीच्या धुरात गुदमरलेल्या दहा वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. तर कुटुंबातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही दुर्दैवी घटना आज पहाटे पावणेपाचच्या सुमारास औरंगाबादेतील उल्कानगरीतील साई रत्न पेट्रोल पंपामागे घडली. संस्कार शामसुंदर जाधव (१०) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. तर शामसुंदर बाबासाहेब जाधव (४५), त्यांची पत्नी सविता (४०) आणि मुलगी संस्कृती (१९) यांच्यावर हेडगेवार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मूळचे पैठण तालुक्यातील करंजखेडा येथील शामसुंदर जाधव यांचा एलईडी व सोलार ऊर्जा उपकरण विक्रीचा व्यवसाय आहे. एक वर्षांपूर्वी अविनाश पाठक यांच्या सहा खोल्यांच्या बंगल्यात जाधव कुटुंबीय किरायाने राहते. बुधवारी रात्री कुटुंबीय झोपी गेले असताना शॉर्टसर्किटमुळे घराच्या पाठीमागील खोलीत अचानक आग लागली. त्यामुळे एलईडी बल्ब आणि सोलार ऊर्जा उपकरणांनी पेट घेतला. त्यामुळे घरात आणि परिसरात धुराचे लोळ पसरले. धुराने जीव गुदमरत असल्याने जाधव कुटुंबीयांनी दुसऱ्या मजल्यावर धाव घेतली. धुरापासून बचाव करण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा आणि खिडक्या आतून लावण्यात आल्या. मात्र, तोपर्यंत धुराने विळखा घातला होता. शॉर्टसर्किटमुळे घरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. जीव गुदमरत असल्याने जाधव कुटुंबीयांनी आरडा-ओरड सुरू केली. त्यांचा आवाज ऐकून पाठीमागील अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कुटुंबीयांनी तात्काळ धाव घेतली. आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन दलासह जवाहरनगर पोलिसांना कळवण्यात आली. अग्निशमन दल दाखल होईपर्यंत परिसरातील बाळगोपाळांसह नागरिकांनी पाण्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दल दाखल झाल्यावर जाधव कुटुंबीयांच्या बचावासाठी दुस-या मजल्यावर पोहोचण्यासाठी शिडीचा वापर करण्यात आला. या मजल्यावरील खिडकी आणि दरवाजा तोडला. तोपर्यंत जाधव कुटुंबीय बेशुध्द पडलेले होते. कुटुंबातील सर्व सदस्यांना तात्काळ खासगी वाहन आणि रुग्णवाहिकेने हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, चिमुकल्या संस्कारचा तोपर्यंत गुदमरुन मृत्यू झाला होता.

तर बचावले असतेः बंगल्याच्या पाठीमागे चिंचोळी गल्ली आहे. तर दुस-या मजल्यावरील खोल्यांना काचेच्या खिडक्या आहेत. धुराचे लोळ बंगल्याच्या चोहोबाजूने पसरले होते. अशावेळी जाधव कुटुंबीय बंगल्याबाहेर आले असते. तर कदाचित संस्कारसह कुटुंबीयांना हानी पोहाचण्याची शक्यता कमी होती. संस्कार हा केंब्रिज शाळेत चौथी वर्गात शिक्षण घेत होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा