‘चीनने भारताचा लडाख क्षेत्रातील ६० चौरस किलोमीटर भूभाग बळाकवला’

0
182
पीपल्स लिबरेश आर्मीचे संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः भारत- चीन दरम्यान सुरू असलेल्या तणावातच चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने भारतीय लष्कर पेट्रोलिंग करत असलेला ६० चौरस किलोमीटरपेक्षा जास्त भूभाग गेल्या महिनाभरात बळावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनने बळाकवलेल्या हा भूभाग पांगाँग सरोवराच्या उत्तरेकडील किनारा आणि गॅल्वान नदीच्या क्षेत्रातील आहे.

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने भारत-चीन नियंत्रण रेषेवरील भारताचे अनेक पेट्रोलिंग पॉइंटही (पीपी) बंद केले आहेत. गेल्या अनेक दशकांपासून भारतीय सैन्य या भागात गस्त घालत आहे. चीनी सैन्याने बंद केलेल्या पेट्रोलिंग पॉइंट्समध्ये क्रमांक १४, १६, १८ आणि १९ क्रमांकाच्या पेट्रोलिंग पॉइंटचा समावेश आहे. रेडिफ डॉट कॉम या संकेतस्थळाने हे वृत्त दिले आहे.

चीनने भारतीय भूप्रदेशात केलेली ही घुसखोरी १९९९ मध्ये पाकिस्तानने कारगीलमध्ये केलेल्या घुसखोरीची पुनरावृत्ती आहे. चीनने पूर्व लडाखमध्ये गॅल्वान नदी आणि पांगाँग सरोवराच्या परिसरात भारतीय सैन्य गेल्या कित्येक दशकांपासून पेट्रोलिंग करत असलेल्या भागात तीन किलोमीटर आतपर्यंत पीपल्स लिबरेशन आर्मीच्या हालचाली मोठ्या प्रमाणात वाढवल्या आहेत. पाकिस्तानी सैन्याने कारगीलमध्ये केलेल्या घुसखोरी वेळी श्रीनगर-झोजिला-कारगील- लेह महामार्गावर वर्चस्व मिळवले होते आणि उत्तरेशी लडाखचा संपर्क तोडून टाकण्याचा धोका निर्माण केला होता, त्याच प्रमाणे चीनने गॅल्वान नदीच्या खोऱ्यात केलेल्या या घुसखोरीमळे डारबुक-श्योक-दौलत बेग ओल्डी हा लष्करीदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या असलेल्या महामार्गावर पीपल्स लिबरेशन आर्मीला सहजपणे नजर ठेवणे शक्य झाले आहे. चीनी सैन्य या महामार्गापासून अवघ्या दीडकिलोमीटर अंतरावर तळ ठोकून बसले आहे, असे रेडिफ डॉट कॉम या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

राहुल गांधींचा संरक्षणमंत्र्यांना थेट सवालः दरम्यान, भारत-चीन तणावादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. चीनने लडाखमध्ये भारतीय भूगाग बळावला आहे का? असा थेट सवाल राहुल गांधी यांनी केला असून संरक्षणंत्र्यांचे हाताच्या प्रतिकावर भाष्य करून झाले असेल तर चीनने लडाखमधील भारतीय भूभाग बळावला आहे का? या प्रश्नाचे उत्तर ते देऊ शकतात, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा