पश्चिम बंगाल विधानसभेत तुफान राडाः टीएमसी-भाजप आमदारांत हाणामारी, अनेक जण जखमी

0
133

कोलकाताः पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून सोमवारी बंगालच्या विधानसभेत तुफान राडा झाला. भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) आमदार विधानसभेत एकमेकांना भिडले. त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत अनेक आमदार जखमी झाले. या घटनेच्या निषेधार्थ भाजप आमदारांनी विधानसभेतून सभात्याग केला.

विधानसभेचे अधिवेशन सुरू होताच भाजप आमदारांनी बीरभूममध्ये झालेल्या हिंसाचारावरून सभागृहात धरणे दिली आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर भाजपचे आमदार हौद्यात आले आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्याच दरम्यान विधानसभा अध्यक्ष विमान बॅनर्जी यांनी भाजप आमदारांना त्यांच्या जागेवर जाऊन बसण्यास सांगितले. तरीही भाजप आमदार हौद्यातून हलले नाहीत. त्यांची घोषणाबाजी सुरूच राहिली.

थोड्यावेळानंतर तृणमूल काँग्रेसचे आमदारही हौद्यात आले आणि त्यांची भाजप आमदारांसोबत झटापट झाली. भाजपच्या आमदारांना सभागृहातच मारहाण करण्यात आली. या हाणामारीत भाजपचे मुख्य प्रतोद मनोज तिग्गा, आमदार नरहरी महतो हे जखमी झाले. एवढेच नव्हे तर महिला आमदार चंबना बौरी यांच्यावरही हल्ला करण्यात आला, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी केला.

 दुसरीकडे भाजप आमदारांनी महिला सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला आणि महत्वाची कागदपत्रे फाडली, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. दरम्यान, या घटनेवरून भाजप आमदार शुभेंदू अधिकारी, मनोज तिग्गा, नरहरी महतो, शंकर घोष आणि दीपक बर्मन यांना निलंबित करण्यात आले आहे.

बीरभूम हिंसाचारावरून पश्चिम बंगालपासून दिल्लीपर्यंत जोरदार राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजप आणि काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. शुभेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वातील एका शिष्टमंडळाने घटनास्थळाचा दौरा करून पाहणीही केली होती.

चला उद्योजक बनाः  स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

बीरभूममधील नेमकी घटना काय?:  २२ मार्च रोजी एका जमावाने रामपुरहाट भागातील बोगतुई गावात बॉम्ब फेकले होते. त्यात १० घरे जळून खाक झाली. त्यात ८ जणांचा मृत्यू झाला होता. तृणमूलचे नेते भादू शेख यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी जमावाने हे बॉम्ब फेकले होते, असे सांगण्यात येते. भादू शेख यांचा मृतदेह सोमवारी आढळून आला होता.

बीरभूम जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराची चौकशी आता सीबीआय करेल, असे कोलकाता उच्च न्यायालयाने शुक्रवारीच स्पष्ट केले होते. एक आठवड्यात वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले. त्या पार्श्वभूमीवर सीबीआयने २१ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला. हत्येच्या इराद्यानेच आग लावण्यात आल्याचे सीबीआयने म्हटले होते. दरम्यान, सीबीआयने भाजपच्या इशाऱ्यावर काम करू नये, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा