मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत पोलिसांनाच स्थानिक कार्यकर्त्यांच्या वेशात राबवून घेतले

0
268
मुख्यमंत्र्यांच्या महाजानदेश यात्रेतील एक क्षण

पुणे/मुंबईः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची पाच वर्षांतील उपलब्धी सांगण्यासाठी काढलेल्या महाजनादेश यात्रेत राज्यभर भाजप कार्यकर्त्यांच्या वेशात पोलिस राबल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेसाठी ही योजना केल्याचे सांगण्यात येत आहे. तीन टप्प्यांत झालेल्या या महाजनादेश यात्रेसाठी पोलिस कर्मचार्‍यांना खास प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षित पोलिसांनी प्रत्येकी आठ-आठ दिवसांसाठी राज्याच्या विविध जिल्ह्यांत जाऊन भाजप कार्यकर्त्यांच्या वेशात बंदोबस्त केला.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाबरोबरच गृहमंत्रीपदही आहे. गृहमंत्री या नात्याने ते पोलिस दलाचे प्रमुख आहेत. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला सुरुवात होताना राज्याच्या प्रत्येक जिल्हा आणि शहर पोलिस दलातून पोलिस कर्मचारी पाठविण्यात आले होते. या पोलिस कर्मचार्‍यांना खास प्रशिक्षणही देण्यात आले होते. महाजनादेश यात्रा ज्या जिल्ह्यात किंवा शहरात जाईल तेथे सामान्य पेहराव करून पोलिस सहभागी होत होते. पुण्यातील महाराष्ट्र इंटेलिजन्स अ‍ॅकॅडमीत निवडलेल्या पोलिसांचे चार-चार दिवसांचे खास प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले होते. या प्रयोगांतून मुख्यमंत्री फडणवीस यांची सुरक्षा अभेद्य ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरीही शेतकर्‍यांच्या फसवणूकप्रकरणी गाजत असणार्‍या कडकनाथ कोंबडी प्रकरणात सांगली आणि इस्लामपूरमध्ये महाजनादेश यात्रेच्या रथावर कार्यकर्त्यांनी अंडी आणि कोंबड्या फेकण्याची घटना घडली. या घटनेच्या वेळी काही क्षणात तेथे दाखल झालेले आणि भाजपचे कार्यकर्ते भासणारे प्रत्यक्षात पोलिस असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. महाजनादेश यात्रेसाठी वापरण्यात आलेली बस आणि त्यात करण्यात आलेले बदल राज्य परिवहन विभागाच्या नियमांचे उल्लंघन करणारे असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली, परंतु त्या टिकेकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या हितासाठी अशा प्रकारे सत्तेचा दुरूपयोग करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे हा मुद्दा आता निवडणूक प्रचारात लावून धरला जाण्याची शक्यता आहे.

स्थानिक गावकऱ्यांच्या वेशात वावरत होते पोलिस

महाजनादेश यात्रा मार्गावरील झाडांची कत्तल वा फ्लेक्स लावून शहरांचे विद्रुपीकरण करण्यात आले. या सगळ्यांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे. गेल्या पाच वर्षांत नक्षलविरोधात राबविण्यात आलेल्या अभियानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. केवळ सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनाच कार्यकर्त्यांच्या किंवा स्थानिक गावकऱ्यांच्या वेशात राबवून घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्याने पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे.

बिंग फुटल्यामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलित

मुखमंत्र्यासह नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस कायमच तत्पर असतात. परंतु, पक्षीय प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेसाठी राज्यभर पोलिसांना कार्यकर्त्यांच्या वेशात राबवून घेण्यात आल्याने आता चर्चेला तोंड फुटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. सत्तेचा दुरूपयोग करून घेतल्याच्या या प्रकरणाचे बिंग फुटल्यामुळे विरोधकांच्या हाती आयतेच कोलित मिळाले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा