कोरोनाच्या संकटातून एकजुटीने महाराष्ट्राला बाहेर काढूः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
38

मुंबई:  कोरोनाचे संकट घालवण्यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेतली जाईल. सर्वांच्या एकजुटीतून आपण हे संकट दूर करू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. लॉकडाऊनची चांगली अंमलबजावणी केल्याने एप्रिल महिन्यात आपण कोरोनाचा प्रसार रोखला होता. आता मे अखेरपर्यंत आपणास ही साथ वाढू द्यायची नाही. सर्वांनी सहकार्य केल्यास यात यश येईल असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज विरोधी पक्षनेते तसेच इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी सहभागी झालेल्या नेत्यांनी कोरोना विषयक लढ्यात आम्ही राज्य शासनाबरोबर आहोत असे सांगून मुख्यमंत्र्यांनी सर्वांना विश्वासात घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, मनसे प्रमुख राज ठाकरे मंत्रालयातून तर मंत्री एकनाथ शिंदे ठाण्याहून आणि इतर नेते राज्याच्या विविध जिल्ह्यांतून सहभागी झाले होते.

टिकेचा हेतू उणीवा दाखवण्याचाः आज कोरोनाशी मुकाबला करीत असताना आपल्याला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. ही अभूतपूर्व परिस्थिती असल्याने केवळ आपले राज्यच नव्हे तर देश आणि जगही यात होरपळले आहे. माझे आपल्याशी मधून मधून दूरध्वनीवरून बोलणे सुरूच असते. आपल्या सूचना मी ऐकत असतो. माध्यमांतून वाचत असतो. त्या योग्य असतील तर लगेच प्रशासनाला कळवत असतो. आपण प्रसंगी टीका करीत असाल, पण त्यात आपला उद्देश उणीवा निदर्शनास आणून शासनाला सूचना करण्याचा असतो, असे ठाकरे म्हणाले.

व्हेंटिलेटर्सपेक्षा ऑक्सिजनची गरजः कडक लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या वाढली नाही. मात्र मेअखेरीपर्यंत आपल्याला अजून काळजी घ्यायची आहे. मुंबईत रुग्णसंख्या वाढते आहे. मात्र बीकेसी, वरळी , रेसकोर्स अशा ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणावर विलगीकरण केंद्रे उभारली आहेत. आपण चाचण्यांची संख्याही खूप वाढवली आहे.  व्हेंटिलेटर्सपेक्षा ऑक्सिजनची गरज आहे. परराज्यातील नागरिकांनाही पुरेशी काळजी घेऊन आम्ही पाठवत आहोत. राज्यांतर्गत लोकांना प्रवासाची परवानगी देण्यापूर्वी व्यवस्थित काळजी घेण्यात येईल. जेणेकरून ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये धोका वाढणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. मालेगाव व औरंगाबाद येथे कंटेटमेंट झोन्समध्ये अधिक शिस्त ठेवण्याची गरज आहे, तेथील लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे अशी विनंती त्यांनी केली.

पिक कर्जाबाबत रिझर्व्ह बँकेला विनंतीः ज्या शेतकऱ्यांना आपल्या कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही त्यांना पिक कर्ज मिळावे म्हणून रिझर्व्ह बँकेशी बोलणे सुरु आहे. बियाणे व खरीप हंगाम व्यवस्थित मार्गी लागावा यासाठी चांगले नियोजन केले आहे. कुठेही औषधे, बियाणे कमी पडणार नाही कापूस खरेदीसंदर्भात केंद्राशी बोलणे सुरु आहे. ज्वारी आणि मका घेण्यासंदर्भात केंद्राने आदेश काढले आहेत. २५ हजार मेट्रिक टन ज्वारी आणि १५ हजार मेट्रिक टन मका खरेदी करण्यात येणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

नेत्यांनी केल्या विविध सूचनाः

  • राज ठाकरे, मनसे प्रमुखः कंटेंटमेंट झोन्सच्या ठिकाणी पोलीस बळ वाढवावे  लागेल. पोलीस थकले आहेत. त्यामुळे एसआरपी फौज आवश्यक आहे. पोलिसांना लोकही गृहीत धरताहेत. अनेक ठिकाणी छोटे दवाखाने बंद आहेत. रुग्णांचे हाल होत आहेत. ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी तरुण अडकले आहेत. त्यांच्या घरी जाण्याची व्यवस्था व्हावी. परप्रांतीय कामगार आज ना उद्या परत येतील तेव्हा त्यांच्या तपासणीची व्यवस्था करावी लागेल. आता परत राज्यात परतणाऱ्या परराज्यातील श्रमिक आणि कामगारांची स्थलांतरित कायद्यान्वये नोंदणी करावी. तसेच यापुढे लॉकडाऊन करताना आगाऊ सूचना द्यावी.
  • प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीः कापूस खरेदी थांबवू नये. रब्बीचे पिक शेतकऱ्याच्या घरात आहे. ते एपीएमसीने विकत घ्यावे. अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करताना शेतीकडे लक्ष द्या. कोणाचाही पगार कापू नका. रिक्षा, हातगाड्या, घेतलेल्यांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. ते पुनर्गठित करावेत. दुकाने उघडायला लावली आहेत. मजुरांना कमीतकमी वेतन दिलेच. परीक्षा होणार की नाही ते स्पष्ट करावे. कुंभार समाजाकडे मातीची रॉयल्टी मागू नये. नाभिक समाजाला देखील दिलासा मिळायला हवा.
  • देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेतेः मुंबई आणि राज्यातील आरोग्य परिस्थितीवर अधिक  लक्ष देण्याची गरज असून रुग्णालय व्यवस्थापन ठीक करण्याची गरज आहे. गंभीर रुग्णांना सेवा मिळाली पाहिजे तसेच आजारी पडणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी नियोजन करावे लागेल. कोविड नसलेल्या रुग्णांना उपचार मिळणे, रुग्णांना बेड्सची व इतर माहिती डॅशबोर्डच्या माध्यमातून मिळावी. रुग्णांचे इतर संपर्क मोठ्या प्रमाणावर शोधले पाहिजे तसेच  प्रशासनात समन्वय हवा तो घडवून आणणे महत्त्वाचे आहे. परराज्यातील २०-२५ हजार श्रमिक पायी घरी निघाल्याचे चित्र आहे. केंद्राला अधिकाधिक रेल्वे मागितल्या पाहिजेत, पोलिसांचे नैतिक बळ वाढवावे, त्यांच्यातही कोरोना वाढतोय, त्यांना पुरेसे संरक्षण मिळावे असे ते म्हणाले. आपली अर्थव्यवस्था सुरु करताना क्षेत्रनिहाय तज्ञांचे गट करावेत आणि गटनिहाय विविध उद्योग व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न करावा. विरोधी पक्ष म्हणून आम्ही पूर्णपणे पाठीशी आहोत. आमच्याकडून राजकारण होणार नाही.
  • प्रवीण दरेकर, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेः उपचार न झाल्याने रुग्णांचा मृत्यू होत असेल तर ते चुकीचे आहे. क्वारंटाइटन केंद्रांमध्ये अधिक सुविधा द्याव्यात. त्यांना भोजन मिळावे यासाठी आढावा घ्यावा. शेतीमाल, आंब्याला, भाजीपाल्याला बाजारपेठ नाही, त्यामुळे  मार्केटिंगची व्यवस्था करावी. असंघटित कामगार, मोलकरणी यांच्या उत्पन्नाची शाश्वती नाही.  त्यांना आधार द्यावा.  मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी परवानगी द्यावी.  कोकणातल्या लोकांसाठी विशेष रेल्वे सोडाव्यात. मालमत्ता कर, उपकर स्थगित करावा.
  • आ. जयंत पाटील, शेकाप नेतेः शेतीसाठी पिक कर्ज व्यवहार ठप्प आहे. बँकांना सूचना करावी व शेतीला प्राधान्य देऊन शेतीवर आधारित उद्योगांना मदत करावी.
  • खा. इम्तियाज जलील, एमआयएमः नॉन कोविड रुग्णांकडे दुर्लक्ष करणे सुरु आहे. औरंगाबादमधील तीन मोठी खासगी रुग्णालये मोठ्या प्रमाणावर पैसे आकारतात. अधिकाऱ्यांत समन्वय आवश्यक आहे. मनपातर्फे ४ कोटी रुपये खर्चून रुग्णालय बांधण्यात आले आहे. पण तिथे काम करण्यासाठी मुंबईच्या तुलनेत अतिशय कमी पगार असल्याने विशेषज्ञ डॉक्टर्स तयार नाहीत. १४ कोटी रुपये खर्चून घाटीची इमारत बांधून तयार आहे पण मनुष्यबळ नाही. मालेगावात सर्व मिल कामगार आहेत. त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही म्हणून त्यांना धान्य मिळत नाही.  दारू दुकाने उघडण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा हेती.आम्ही राज्य शासनाबरोबर आहोत.
  • अबू आझमी, समाजवादी पक्षः प्रत्येक रुग्णालयात नॉन कोव्हीड रुग्णांना उपचार मिळावेत. डायलेसिस रुग्णांचा प्रश्न मिटावा. परराज्यातील श्रमिकांना घरी पाठवण्याची जबाबदारी पोलिसांकडे देऊ नये. एक वेगळा सामाजिक संस्थांचा गट करून त्यांच्याकडे जबाबदारी द्यावी.
  • प्रा. जोगेंद्र कवाडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीः  बारा बलुतेदार यांना उत्पन्नाचे साधन मिळवून द्यावे. बाहेर कोरोनाने मृत्यू आणि आतमध्ये उपाशी राहिल्याने मृत्यू असे होऊ नये. परराज्यातील कामगारांना त्यांच्या राज्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबई, कुर्ला, मुंबई सेन्ट्रल, दादर येथून रेल्वेचे नियोजन करावे.
  • आ. हितेंद्र ठाकूर, बहुजन विकास आघाडीः पालघर  रेड झोन मध्ये आहे. पण याठिकाणी आदिवासी भाग आहे त्यांचे हाल होत आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. बांधकामे बंद आहेत. पावसाला सुरुवात झाली तर सिमेंटचा साठा खराब होईल. सकाळ, संध्याकाळ लोकल ट्रेन्स काही प्रमाणात तरी सुरु झाल्या पाहिजेत.
  • प्रकाश रेड्डी,भाकपः कामगार विभाग जास्त कार्यरत केला पाहिजे. रेल्वेशी चांगला समन्वय ठेवून काम करावे.
  • अशोक ढवळे,माकपः कष्टकरी जनतेला दिलासा देण्याची गरज आहे. सोशल डिस्टन्सिंग या शब्दाऐवजी शारीरिक अंतर हा शब्द वापरावा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा