कार्यालयीन वेळेची १० ते ५ ही मानसिकता बदला, धोरण ठरवाः मुख्यमंत्री ठाकरेंचा केंद्राकडे आग्रह

0
435

 मुंबईः कोरोनाचा लढा संपलेला नाही. आपणही व्हीसी वगैरेंच्या माध्यमातूनच भेटतो आहोत. कार्यालयीन वेळच्या बाबतीतही पारंपरिक १० ते ५ ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे आहे त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज दूरदृश्य प्रणालीद्वारे नीती आयोगाची सहावी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ठाकरे बोलत होते. कल करे सो आज कर, आज करे सो  अभी  अशी राज्य शासनाची भूमिका असून कोरोना काळातही राज्य शासनाने विकास थांबवला नाही तर आलेल्या संकटावर मात करीत आम्ही मार्ग काढत होतो. आम्ही आपत्तीला संधीमध्ये बदलवीत आहोत, असे ठाकरे म्हणाले.  

गावागावात इंटरनेट कनेक्टिव्हीटी पोहोचवाः गेल्या वर्षभरात आपण माहिती तंत्रज्ञानावर भरपूर भर दिला असून इंटरनेट सुविधा सर्व गावांमध्ये पोहचणे आमचे उद्दिष्ट्य आहे. भारतनेट च्या माध्यमातून इंटरनेट सुविधा जाळे पसरविणे सुरु असले तरी अजून दुर्गम भागातील २५०० पेक्षा जास्त गावे व खेड्यांमध्ये इंटरनेट व मोबाईल कनेक्टिव्हीटी पोहचलेली नाही. केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालून ही सुविधा राज्याला लवकरात लवकर कशी मिळेल ते पाहावे असेही मुख्यमंत्री म्हणाले. गावोगावच्या नागरिकांना माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व सेवांचा जलद, चांगला लाभ मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत असेही ते म्हणाले. 

जय कामगार घोषणाही महत्वाचीः जय जवान, जय किसान यासोबतच जय कामगार अशी घोषणाही महत्वाची आहे. कामगार हा देशाचे अर्थचक्र चालवतो त्यामुळे गुंतवणुकीच्या जोडीने रोजगार किती निर्माण होतो आणि या कामगार वर्गाचे संरक्षण यालाही तितकेच महत्व आहे असे ठाकरे म्हणाले. लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान, जय किसान अशी घोषणा दिली. पण माझे वडील बाळासाहेब नेहमी म्हणायचे की या जोडीने जय कामगार ही  घोषणा पण महत्वाची आहे. कारण जसे शेतकरी पीक पिकवतो व खाऊ घालतो, जवान हे देशाच्या सीमेचे संरक्षण करतात तसेच कामगार हा अर्थचक्र चालवतो. त्यांना पुरेसे संरक्षण मिळालेच पाहिजे. उद्योगांतून केवळ किती भांडवल येते हे महत्वाचे नाही तर रोजगार निर्मिती किती झाली त्याला महत्व आहे असेही ठाकरे म्हणाले.

पर्यावरण बदलानुरुप शेतीचे धोरण हवेः पर्यावरण बदलामुळे आता आपल्याला देशाच्या शेती क्षेत्रात देखील अमूलाग्र बदल करण्याची गरज आहे असे ठाकरे म्हणाले. पर्यावरण बदलामुळे केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशात इतरत्रही फटका बसत आहे. आपण विविध योजना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवतो, पण त्या बऱ्याच प्रमाणात आर्थिक लाभाच्या किंवा कर्जाशी संबंधित असतात. पर्यावरण बदलाच्या अनुषंगाने माध्यमांतून प्राधान्याने चर्चा होणे व त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. आपल्याला बदलत्या वातावरणानुसार शेतीची पद्धतही बदलावी लागेल असे सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्यात सुरु केलेल्या विकेल तेच पिकेल या अभियानाची माहिती दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा