औरंगाबादेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाकारले ‘सिंहासन’; अधिकारी, मंत्र्यांची उडाली तारांबळ

0
1573

औरंगाबादः हे तुमचे सरकार आहे, मी तुमचा म्हणजेच जनतेचा मुख्यमंत्री आहे, असे वारंवार सांगणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबादेत ते जनतेचे मुख्यमंत्री असल्याची प्रचिती दिली. येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना बसण्यासाठी खास ‘सिंहासना’ची व्यवस्था करण्यात आली होती, मात्र त्यांनी हे सिंहासन नाकारले आणि साधी खुर्ची मागवून मंचावर आसनस्थ झाले.मात्र मुख्यमंत्र्यांनी अचानक घेतलेल्या या पवित्र्यामुळे मंत्री आणि अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

चिकलठाणा येथील गरवारे क्रीडा संकुल येथे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचे प्रत्यक्ष भूमिपूजन आणि आभासी पद्धतीने हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन आणि स्मारक भूमिपूजन, जंगल सफारी पार्क भूमिपूजन, शहरातील विविध रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ ठाकरे यांच्या हस्ते आज झाला. त्यावेळी हा प्रसंग पहायला मिळाला.

गरवारे क्रीडा संकुलावर उभारण्यात आलेल्या मंचावर मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासाठी खास ‘सिंहासना’सारखी खुर्ची ठेवण्यात आली होती. तर मंत्रिमंडळातील त्यांचे उर्वरित सहकारी आणि आमदार-खासदार, अधिकाऱ्यांसाठी साध्या खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. मंचावर पोहोचताच मुख्यमंत्री ठाकरे यांनी हे सिंहासन हटवण्याचे फर्मान सोडले. त्यामुळे मंचावर काहीवेळासाठी धावपळ उडाली. मुख्यमंत्र्यांच्या या अनपेक्षित पवित्र्याने मंत्री आणि अधिकारीही गोंधळून गेले.

हेही वाचाः औरंगाबादेतील गुंठेवारी, सिडकोतील घरांच्या फ्रीहोल्डचा प्रश्न सोडवण्याचे आदेश दिलेः ठाकरे

फर्मान मुख्यमंत्र्यांचेच असल्यामुळे हे सिंहासन राहू द्या आणि तुम्ही त्यावर आसनस्थ व्हा, असा आग्रह धरण्याची हिम्मतही कोणी दाखवून शकले नाही. त्यामुळे मंचावर इतर मंत्री आणि मान्यवरांना बसण्यासाठी जशा खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या, तशीच खुर्ची मुख्यमंत्र्यांसाठीही मागवण्यात आली. ती खुर्ची मंचावर ठेवण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री आसनस्थ झाले आणि पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांनी घेतलेली ही भूमिका पाहून समारंभस्थळी उपस्थितांनाही ठाकरे हे खरेच जनतेतील मुख्यमंत्री आहेत, याची प्रचिती आली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा