मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर आठ उमेदवारही विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम मुदत होती. या मुदतीत अन्य कोणाचाही उमेदवारी अर्ज न आल्यामुळे सर्वच्या सर्व नऊ उमेदवारांची निवड बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
उद्धव ठाकरे हे आता राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेचे सदस्य झाले आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. ते राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्यामुळे २७ मेपूर्वी त्यांना दोन्हीपैकी एका सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक होते.
विशेष म्हणजे कोरोनाच्या संकटामुळे घोषित झालेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका निवडणूक आयोगाने स्थगित केल्या होत्या. त्यानंतर राज्यातील राजकीय अस्थैर्य टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नामनिर्देशित करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवला होता. त्यावर त्यांनी कोणताही निर्णय न दिल्याने शिवसेनेसह राज्यातील सर्वच पक्षांनी राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका घेण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने ९ जागांसाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार २१ मे रोजी या निवडणुकासाठी मतदान होणार होते. परंतु प्रतिस्पर्धी उमेदवारच नसल्यामुळे आज नऊ उमेदवारांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
बिनविरोध निवडलेले पक्षनिहाय उमेदवार असेः
- शिवसेनाः उद्धव ठाकरे, निलम गोऱ्हे
- राष्ट्वादी काँग्रेसः अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे
- काँग्रेसः राजेश राठोड
- भाजपः प्रवीण दटके, रमेश कराड, रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडाळकर.